वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, युवराज सिंग आणि प्रग्यान ओझा या अनुभवी खेळाडूंच्या नावांची भारताच्या कसोटी संघाची निवड करताना चर्चासुद्धा झाली नाही. याबाबत संदीप पाटील म्हणाले, ‘‘युवराजबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. कर्णधार आणि निवड समितीपैकी कोणी कोणाबाबत चर्चा केली किंवा काय केली, हे मी सांगू शकणार नाही.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘जेव्हा आम्ही एखाद्या खेळाडूची निवड करतो, तेव्हा तो प्रत्येक खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे, याची आम्हाला पूर्णत: जाणीव असते. त्यामुळे भावनांना इथे मुळीच स्थान नसते. कोणत्याही खेळाडूबाबत आमची भावनिकता नसते. कामगिरी, तंदुरुस्ती आणि सांघिक समतोल या गोष्टी संघनिवडीसाठी आम्ही महत्त्वाच्या मानतो.’’
‘‘मोहम्मद शमी वगळता बाकी सर्व खेळाडू तंदुरुस्त असल्याचा आमच्याकडे अहवाल होता. शमी चार आठवडय़ांनी उपलब्ध होऊ शकेल. अन्यथा सर्वच खेळाडू बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी उपलब्ध असले असते,’’ असे पाटील यांनी सांगितले.testकोणत्याही वरिष्ठ खेळाडूला बांगलादेश दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आलेली नाही. याबाबत स्पष्टीकरण देताना पाटील म्हणाले, ‘‘भारतीय संघ एकापाठोपाठ एक सामने खेळत आहे. आम्ही निवडीचे धोरण ठरवताना काही खेळाडूंना विश्रांती देता येईल का, याचप्रमाणे खेळाडूंच्या विनंत्यांचाही विचार करतो.’’
‘‘बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी कोणत्याही खेळाडूने विश्रांतीबाबतची विनंती केली नव्हती. त्यामुळे आम्हाला हा सर्वोत्तम संघ निवडता आला,’’ असे ते पुढे म्हणाले.
भारतीय संघाची समतोलपणे निवड करताना बांगलादेशची संघरचना गृहीत धरण्यात आली. याविषयी पाटील म्हणाले, ‘‘१५ खेळाडूंची निवड करताना त्यांच्या संघातील स्थानाबाबत चर्चा होते. त्यामुळेच योग्य समतोल साधता येतो. बांगलादेशच्या फलंदाजीच्या फळीत सहा डावखुऱ्या फलंदाजांचा समावेश आहे. त्यामुळे दोन ऑफ-स्पिनर गोलंदाजांची निकड असल्याचे बैठकीत निश्चित झाले.’’
‘‘आम्ही काही उदयोन्मुख ऑफ-स्पिनर्सच्या नावांचीही चर्चा केली. परंतु निवड समिती आणि कर्णधाराने अखेरीस हरभजनच्या नावाला कौल दिला,’’ असे त्यांनी सांगितले.भारताच्या कसोटी संघातून रवींद्र जडेजाला वगळण्यात आले आहे. याचे स्पष्टीकरण देताना पाटील म्हणाले, ‘‘आम्ही जडेजाप्रमाणेच अन्य फिरकी गोलंदाजांच्या नावांचीही चर्चा केली. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी आम्ही सर्वोत्तम कामगिरीच्या अनुषंगाने फिरकी गोलंदाजाला स्थान दिले आहे. कोणत्याही स्पध्रेसाठी किंवा मालिकेसाठी आम्ही निवड समितीची बैठक घेतो, तेव्हा प्रतिस्पर्धी
संघाच्या ताकदीचा गांभीर्याने विचार करतो.’’

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs bangladesh sandeep patil