India vs Bangladesh 2nd Test Updates in Marathi: भारत वि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कानपूर येथे खेळवला जात आहे. या सामन्यावर सुरूवातीपासूनच पावसाचे संकट होते आणि या कसोटी सामन्याला पावसाचा फटका बसलेला पाहायला मिळत आहे. ग्रीन पार्क स्टेडियम येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळही रद्द करण्यात आला आहे. कानपूर येथे सकाळपासून पाऊस नसूनही तिसऱ्या दिवसाचा खेळ झाला नाही.

हेही वाचा – WTC Points Table: श्रीलंकेमुळे ऑस्ट्रेलियाचा WTC अंतिम फेरीचा मार्ग खडतर; कसोटी मालिकेत न्यूझीलंड संघावर मिळवला एकतर्फी विजय

IND vs BAN: पाऊस नसतानाही भारत-बांगलादेश कानपूर कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ का केला रद्द?

२७ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज रविवार हा तिसरा दिवस होता. तिसऱ्या दिवशी पाऊस नसतानाही एकही चेंडू न टाकता सामना रद्द करण्यात आला. कारण, आऊटफिल्ड ओली असल्याने तिसऱ्या दिवसाचा खेळ अखेरीस रद्द करावा लागला. रविवारी पाऊस पडण्याची चिन्हे नव्हती पण आऊटफिल्ड ओली असल्याने सामना वेळेत सुरू झाला नाही. पहिल्यांदा १० वाजता, मग दुपारी १२ वाजता आणि २ वाजता मैदानाची पाहणी केल्यानंतर मैदान खेळण्याजोगे तयार नव्हते आणि यामुळे पंचांनी तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द केला.

कानपूर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी १० वाजता पाऊस थांबला पण दुपारी २ वाजता खेळ रद्द झाल्याचे जाहीर केले. तिसऱ्या दिवशी, पाऊस पडला नाही पण आऊटफिल्ड ओली असल्याने खेळ सुरू होऊ शकला नाही. पाऊस नसतानाही, खराब ड्रेनेज सिस्टीममुळे मैदानावर काही ठिकाणी ओलसर भाग तसाच होता.

हेही वाचा – IPL Auction 2025: विदेशी खेळाडूंवर वचक बसवण्यासाठी BCCI ची युक्ती, आयपीएलमध्ये ‘हा’ नियम मोडल्यास दोन वर्षांची बंदी

दुसऱ्या कसोटीत आतापर्यंत केवळ ३५ षटके टाकण्यात आली आहेत. बांगलादेशने पहिल्या दिवशी ३ बाद १०७ धावांपर्यंत मजल मारली आणि त्यानंतर आलेल्या पावसाने खेळ रद्द केला. दुसऱ्या दिवशी, शनिवारी एकही चेंडू न टाकता खेळाडू पुन्हा हॉटेलवर परतले आणि रविवारीही तीच परिस्थिती कायम होती. ग्रीन पार्कमधील चांगली ड्रेनेज सिस्टीम आणि पायाभूत सुविधा नसल्याने कसोटीचा तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला.

हेही वाचा – पाच खेळाडू रिटेन…मॅच फीची सुरुवात आणि दोन वर्षांची बंदी, IPL 2025 पूर्वी घेतले ‘हे’ आठ मोठे निर्णय

आता कानपूर कसोटीचा दोन दिवसांचा खेळ शिल्लक असल्याने कसोटी सामना ड्रॉ होण्याच्या मार्गावर आहे. पुढील दोन दिवसांचा म्हणजेच सोमवार आणि मंगळवारदिवशी हवामानाचा अंदाज चांगला आहे, पण दोन दिवसच बाकी असल्याने दोन्हीपैकी एखादा संघही विजयाच्या जवळ पोहोचेल अशी आशा नाही. दुसरा कसोटी सामना अनिर्णित राहिल्यास वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारताला याचा फटका बसणार आहे.