India vs England 1st ODI Result : भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना केनिंग्टन ओव्हलवर झाला. हा सामना भारताने १० गडी राखून जिंकला. जसप्रीत बुमराहचे सहा बळी आणि कर्णधार रोहित शर्माचे अर्धशतक, ही आजच्या सामन्याची वैशिष्ट्ये ठरली. जसप्रीत बुमराहच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीमुळे भारतीय संघाने इंग्लंडला २५.२ षटकांमध्ये गुंडाळले होते. इंग्लंडने सर्व गडी गमावून ११९ धावा केल्या. भारताविरुद्ध इंग्लंडची ही आतापर्यंतची सर्वात कमी धावसंख्या ठरली.
इंग्लंडने दिलेले १११ धावांचे लक्ष्य भारताने १८.४ षटकांमध्येच पूर्ण केले. कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी भारतीय डावाची सुरुवात केली. दोघांनी संयमी फलंदाजी करत भारताला सहज विजय मिळवून दिला. रोहित शर्माने नाबाद ७६ आणि शिखर धवनने नाबाद ३१ धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने यजमान इंग्लंडचा त्यांच्याच भूमीवर १० गडी राखून पराभव केला.
त्यापूर्वी, भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवला. जसप्रीत बुमराहने इंग्लंडला सुरुवातीला दोन धक्के दिले. आपल्या पहिल्याच षटकात त्याने जेसन रॉयला आणि जो रूटला बाद केले. दोघांना खातेही उघडता आले नाही. रॉय आणि रूट दोघेही बाद झाल्यानंतर बेन स्टोक्स मैदानात आला. मात्र, मोहम्मद शमीने त्यालाही शून्यावर बाद केले.
सुरुवातीचे तीन खेळाडू बाद झाल्यानंतर जॉनी बेअरस्टो इंग्लंडचा डाव सांभाळेल असे वाटत होते. मात्र, जसप्रीत बुमराहने त्याचीही डाळ शिजू दिली नाही आणि तो पंतच्या हाती झेलबाद झाला. बेअरस्टोने सात धावा केल्या. जसप्रीत बुमराहने लियाम लिव्हिंगस्टोनलाही शून्यावर बाद केले. जसप्रीत बुमराहने आजच्या सामन्यात अवघ्या १९ धावा देऊन सहा बळी घेतले. मोहम्मद शमीने तीन आणि प्रसिद्ध कृष्णाने एक बळी घेऊन इंग्लंडचा डाव थोडक्यात गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. इंग्लंडचा सर्व संघ ११० धावांमध्ये बाद झाला.
आजचा सामना जिंकल्यामुळे तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताला १-० अशी आघाडी मिळाली आहे. मालिकेतील दुसरा सामना १४ जुलै रोजी लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवरती होणार आहे.