भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान पाच फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत असंख्य आव्हानांना सामोरे जात युवा खेळाडूंनी दमदार कामगिरी करत भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. मात्र, आता अनुभवी खेळाडू परतल्यामुळे इंग्लंडविरोधातील कसोटीत कोणाला अंतिम ११ मध्ये संधी द्यायची, हा पेच भारतीय संघ व्यवस्थापनापुढे निर्माण झाला आहे. क्रीडा तज्ज्ञांच्या मते गाबामध्ये ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या भारतीय संघातील पाच खेळाडूंना पहिल्या कसोटी सामन्यातून वगळण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलियात झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात तंदुरुस्त ११ खेळाडू निवडण्यासाठी कठीण गेलं होतं. कारण, विराट कोहली, इशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार सारखे दिग्गज खेळाडूंनी आधीच मालिकेतून माघार घेतली होती. त्यानंतर मालिकेदरम्यान, मोहम्मद शमी, उमेश यादव, रविंद्र जाडेजा, आर. अश्विन आणि के. एल राहुल दुखापतग्रस्त होते. आता इंशात, बुमराह आणि अश्विन तंदुरुस्त आहेत. शिवाय कर्णधार विराट कोहलीचेही पुनरागमन झालं आहे. त्यातच भारतीय मैदानावर सामने असल्यामुळे अतिरिक्त फिरकीपटूला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. सर्व बाबींचा विचार केल्यास गाबाच्या मैदानावर ऐतिहासिक विजाय मिळवणाऱ्या भारतीय संघातील पाच खेळाडूंना अंतिम ११ मध्ये संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे.

यांना मिळू शकतो डच्चू?-
गाबा कसोटीत पदार्पण करणाऱ्या नटराजनला इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात १८ जणांच्या भारतीय संघात स्थान मिळालं नाही. याशिवाय मयांक अगरवाल, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज यांनाही डच्चू मिळू शकतो.

म्हणून मयांक बाहेर?-
मयांक अगरवाल सलामी फलंदाज आहे, पण गाबा कसोटीत हनुमा विहारीच्या जागी मधल्या फळीत खेळला होता. चेन्नई कसोटी सामन्यात शुबमन गिल आणि रोहित शर्मा सलामीला खेळण्याची शक्यता आहे. तसेच विराट कोहली परतल्यामुळे मधल्याफळीत मयांकसाठी जागा राहत नाही.

सुंदरलाही मिळू शकतो डच्चू ?
वॉशिंगटन सुंदरला गाबा कसोटी सामन्यात आर. अश्विनच्या जागी खेळवण्यात आलं होतं. त्यातच घरच्या मैदानावर टीम इंडिया एकाच शैलीच्या फिरकीपटूंना संघात स्थान देत नाही. त्यामुळे अश्विन परतल्यामुळे सुंदरला डच्चू मिळण्याची शक्यता आहे. चेन्नई कसोटीत अक्षर पटेलचं पदार्पण होण्याची शक्यताही आहे. कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि आर. अश्विन या तीन फिरकी गोलंदाजासह विराट कोहली मैदानात उतरण्याची शक्यता आहे. डाव्या हाताचा अक्षर पटेल आणि चायनामन कुलदीप यांना संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. इंग्लंडचे फलंदाज डाव्या हात्याच्या गोलंदाजाविरोधात नांगी टाकतात असा विक्रम आहे. त्यामुळे अक्षर पटेलला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

सिराज आणि शार्दुलला बाहेरचा रस्ता?
गाबाच्या मैदानावर भारतीय संघ चार वेगवान गोलंदाजासह मैदानावर उतरला होता. मात्र, चेन्नईमध्ये फक्त दोन गोलंदाजासह मैदानावर उतरेल. नटराजन याआधीच संघाबाहेर आहे. दोन वेगवान गोलंदाज खेळणार असलीत तर अनुभवी इशांत आणि बुमराहला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शार्दुल आणि सिराज यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. जर भारतीय संघ तीन वेगवान आणि दोन फिरकी गोलंदाजासह मैदानात उतरला तर सिराज किंवा शार्दुल यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.

सामन्यापूर्वीच संघनिवडीचा पेच सुटेल ?-
गेल्या काही दिवसांपासून सामन्याच्या एक दिवस आधीच भारतीय संघाची निवड करण्यात येतेय. त्यामुळे चार फेब्रुवारी रोजी पहिल्या कसोटी सामन्यात खेळवण्यात येणाऱ्या विराट कोहली अॅण्ड कंपनीची घोषणा करण्यात येईल.

असा असू शकतो भारतीय संघ –
शुबमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, अक्षर पटेल, आर. अश्विन, इशांत शर्मा, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह

Story img Loader