England vs India 1st Test Live Updates : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने दुसऱ्या डावात १ बाद ९ धावा केल्या. इंग्लंडचा सलामीवीर अलिस्टर कुक याला पुन्हा एकदा अश्विनने त्रिफळाचित केले. तत्पूर्वी, भारताचा डाव सर्वबाद २७४ धावात आटोपला. एका वेळी बलाढ्य वाटणाऱ्या २८७ धावांचा पाठलाग करताना विराटने अप्रतिम १४९ धावांची खेळी केली. ‘साहेबां’च्या भूमीवर त्याने पहिले आणि कारकिर्दीतील २२वे शतक ठोकले. त्याला उमेश यादवने १६ चेंडूत नाबाद १ धाव, तर इशांत शर्माने १७ चेंडूत ५ धावा काढत त्याला चांगली साथ दिली. याशिवाय, इतर फलंदाज आपला प्रभाव पडू शकले नाहीत. इंग्लंडतर्फे कुर्रानने ४ तर रशीद, स्टोक्स आणि अँडरसनने २-२ गडी बाद केले.
त्याआधी भारताने उपहारानंतर ३ बाद ७६ या धावसंख्येवरून खेळास सुरुवात केली होती. रहाणेने कोहलीला चांगली साथ दिली. पण अजिंक्य रहाणेला १५ धावांवर बेन स्टोक्सने बाद केले. रहाणे स्लीपमध्ये झेलबाद झाला. त्यापाठोपाठ दिनेश कार्तिकही लगेच बाद झाला. बेन स्टोक्सने कार्तिकला शून्यावर त्रिफाळाचित केले. त्यामुळे भारताची अवस्था ५ बाद १०० झाली होती. कर्णधार विराट कोहलीला हार्दिक पांड्याने चांगली साथ दिली होती. मात्र एका अप्रतिम इन स्विगिंग यॉर्कर चेंडूवर पांड्या बाद झाला. त्याने ५२ चेंडूत २२ धावा केल्या.
भारताचा डाव सुरु होण्याआधी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा डाव २८७ धावांत संपुष्टात आला. अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने ४ तर मोहम्मद शमीने ३ बळी टिपले. त्यानंतर भारताच्या डावाला सुरुवात झाली. भारताने बिनबाद ५० धावा केल्या होत्या. त्यानंतर मात्र मुरली विजय, लोकेश राहुल आणि शिखर धवन तिघे झटपट बाद झाले.
इंग्लंडच्या पहिल्या डावात अश्विन आणि शमीव्यतिरिक्त इशांत आणि उमेश यादवने प्रत्येकी १ बळी टिपला. इंग्लंडतर्फे कर्णधार रूटने सर्वाधिक ८० धावा केल्या. तर बेअरस्टोने ७० धावांची खेळी केली. काल सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर इंग्लंडचा डाव ९ बाद २८७ वर थांबवण्यात आला होता.