साऊदम्पटन आणि मँचेस्टर या दोन कसोटी सामन्यांमधील मानहानीकारक पराभव भारताच्या चांगलेच जिव्हारी लागलेले आहेत, या दोन्ही पराभवांचे शल्य विसरून भारतीय संघ जिंकण्याच्या इर्षेने सज्ज झाला तरच त्यांना पाचवा आणि निर्णायक कसोटी सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधता येईल. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक विजयानंतर भारताला दोन पराभव पत्करावे लागल्याने इंग्लंडने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे भारताला जर मालिका वाचवायची असेल तर त्यांना हा सामना जिंकण्यावाचून दुसरा कोणताही पर्याय नसेल. दुसरीकडे इंग्लंडने हा सामना अनिर्णीत राखल्यास त्यांना मालिका २-१ अशी जिंकता येईल. त्यामुळे कोणत्या मानसिकतेने संघ मैदानावर उतरतो, यावर संघाच्या जय-पराजयाचे समीकरण अवलंबून असेल.
लॉर्ड्सवर ऐतिहासिक विजयाच्या उन्मादात भारतीय संघ मश्गूल राहिला आणि त्यानंतर सलग दोन मानहानीकारक पराभव भारताच्या पदरी पडले. लॉर्ड्सवरील विजयानंतर भारताच्या फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाडय़ा निष्प्रभ झाल्या. फलंदाजीमध्ये विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा सातत्याने अपयशी ठरत आहे. मुरली विजय, महेंद्रसिंग धोनी यांना फलंदाजीत सातत्य ठेवता आलेले नाही, तर रवींद्र जडेजाची फलंदाजी कुचकामी ठरत आहे. अजिंक्य रहाणेकडून संघाला मोठय़ा खेळीची अपेक्षा असेल. संघात पुनरागमन करणारा गौतम गंभीर छाप पाडू शकलेला नाही. भारताच्या फलंदाजांमध्ये खेळपट्टीवर टिकाव धरण्याचा अभाव असल्याचे या मालिकेत दिसून आले असून ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. मोइन अलीसारख्या नवख्या फिरकीपटूपुढे भारतीय फलंदाजांनी पत्करलेली शरणागती दुर्दैवी आहे.
गोलंदाजीमध्ये भुवनेश्वर कुमार सोडल्यास एकाही गोलंदाजाला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. या सामन्यात इशांत शर्मा खेळण्याची शक्यता असून पंकज सिंगला वगळण्याची चिन्हे आहेत.
इंग्लंडचा संघ चांगल्या फॉर्मात असून जेम्स अँडरसन हा त्यांचा हुकमी एक्का यशस्वी ठरलेला आहे. भारतीय फलंदाजांवर त्याने आपला अंकुश ठेवला आहे. स्टुअर्ट ब्रॉड आणि जो रूट यांच्याविषयी संदिग्धता आहे. ब्रॉडच्या अनुपस्थितीत इंग्लंडने सामना जिंकला असल्याने त्याला सुरक्षेच्या कारणास्तव संघाबाहेर ठेवल्यास संघावर जास्त परिणाम होणार नाही. पण रूटसारखा नांगरधारी फलंदाज खेळणार नसल्यास इंग्लंडसाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते. अ‍ॅलिस्टर कुक आणि इयान बेल यांच्याकडून संघाला मोठी अपेक्षा असेल.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार, यष्टिरक्षक) मुरली विजय, गौतम गंभीर, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, स्टुअर्ट बिन्नी, आर. अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, ईश्वर पांडे, पंकज सिंग, वरुण आरोन आणि नमन ओझा.
इंग्लंड : अ‍ॅलिस्टर कुक (कर्णधार), मोइन अली, जेम्स अँडरसन, गॅरी बॅलन्स, इयान बेल, स्टुअर्ट ब्रॉड, ख्रिस जॉर्डन, जोस बटलर (यष्टिरक्षक), सॅम रॉबसन, जो रूट, बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स आणि स्टिव्हन फिन.
सामन्याची वेळ : दुपारी. ३.३० वा.पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर.
पाचव्या कसोटीत आम्ही पाच गोलंदाजांनिशी उतरणार आहोत. भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे खेळण्याची शक्यता कमी वाटत होती, पण तो ८० टक्के तंदुरुस्त आहे. आतापर्यंत त्याने मालिकेत दमदार गोलंदाजीबरोबर उपयुक्त फलंदाजीही केली आहे. हा सामना आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. सामन्याचे प्रत्येक सत्र महत्त्वाचे असते, जर तुम्ही प्रत्येक सत्रामध्ये चांगला खेळ केला तर अनुकूल निकाल लागू शकतो. हा सामना आमच्यासाठी महत्त्वाचा असून प्रत्येक सत्रात चांगला खेळ करण्यावर आमचा भर राहील.
 – महेंद्रसिंग धोनी, भारताचा कर्णधार

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मला सहज लक्ष्य करता येऊ शकते, असा भारतीय फलंदाजांचा समज होता. भारतीय फलंदाजांनी माझे अजिबात दडपण बाळगले नाही, त्यामुळेच मला भरपूर बळी मिळवता आले. भारतीय फलंदाजांनी मला लक्ष्य केले, पण तेच मला बळी मिळवण्यासाठी फायदेशीर ठरले. भारतीय फलंदाज हे फिरकी गोलंदाजी छानप्रकारे खेळून काढतात. पण मला इतके बळी कसे मिळू शकले, याचेच मला आश्चर्य वाटते. मीसुद्धा इतके फलंदाज माघारी पाठवू शकतो, हे सिद्ध झाल्यामुळे मी आनंदी आहे. यापुढेही मी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहे. कसोटीसाठीचा फिरकी गोलंदाज म्हणून मी स्वत:ला सिद्ध करणार आहे.
– मोईन अली,  इंग्लंडचा फिरकीपटू
   

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs england 2014 team india in do or die situation