भारत आणि इंग्लंड या संघात नॉटिंगहॅममध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीचा पाचवा दिवस पावसामुळे वाया गेला. त्यामुळे ही कसोटी अनिर्णीत सुटली आहे. शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी १५७ धावांची गरज होती. पण पंचांनी चहापानापर्यंत पाऊस ओसरण्याची वाट पाहिली. चहापानानंतर पावसाने अधिक जोर धरल्याने पंचांनी सामना न खेळवण्याचा निर्णय घेतला. चौथ्या दिवसअखेर भारताने १ बाद ५२ धावा केल्या होत्या. पहिल्या डावात दमदार खेळी करणाऱ्या लोकेश राहुलला स्टुअर्ट ब्रॉडने तंबूचा मार्ग दाखवत इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर चौथ्या दिवसअखेर सलामीवीर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा प्रत्येकी १२ धावांवर नाबाद होते.

 

इंग्लंडचा दुसरा डाव

तिसऱ्या दिवसअखेर बिनबाद २५ धावांवरून पुढे खेळणाऱ्या इंग्लंडने चौथ्या दिवशी सकाळच्या सत्रात रोरी बर्न्स आणि जॅक क्रॉलीला गमावले. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने सलामीवीर रोरी बर्न्सला (१८) पॅव्हेलियनमध्ये पाठवले, ऋषभ पंतने यष्टीमागे त्याचा शानदार झेल घेतला. त्यानंतर जसप्रीत बुमराहने जॅक क्रॉलीला (६) तंबूचा मार्ग दाखवला. त्यानंतर जो रूट आणि डॉमिनिक सिब्ले या दोघांनी इंग्लंडला दीडशे धावांच्या जवळ पोहोचवले. सिब्लेनंतर आलेल्या जॉनी बेअरस्टोने ३० आणि त्यानंतर सॅम करनने ३२ धावांचे योगदान दिले. एका बाजूला किल्ला लढवणाऱ्या जो रूटने चहापानानंतर २१वे कसोटी शतक पूर्ण केले. रूटने १४ चौकारांसह १०९ धावांची उपयुक्त खेळी केली. बुमराहने रूटला बाद केले. भारताकडून बुमराहने ५ तर मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी २ बळी घेतले.

हेही वाचा – Tokyo 2020 : ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राला आनंद महिंद्रांकडून भलं मोठं Surprise!

भारताचा पहिला डाव

इंग्लंडला १८३ धावांवर गुंडाळल्यानंतर भारताकडून रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी ९७ धावांची दमदार सलामी दिली. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनने रोहितला वैयक्तिक ३६ धावांवर माघारी धाडत संघाला पहिले यश मिळवून दिले. रोहित माघारी परतल्यानंतर संघाचे आधारस्तंभ विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे झटपट बाद झाले. विशेष म्हणजे विराट शून्यावर माघारी परतला. इंग्लंडचा तेजतर्रार गोलंदाज जेम्स अँडरसनने आपली जादू कायम राखत विराटला पहिल्याच चेंडूवर बाद केले.

त्यानंतर एका बाजूला स्थिरावलेल्या राहुलने रवींद्र जडेजाला सोबत घेत अर्धशतकी भागीदारी उभारली. उपाहारानंतर लोकेश राहुल शतक साकारेल, असे सर्वांना वाटत होते. पण इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने त्याला आपल्या जाळ्यात अडकवले. राहुलने २१२ चेंडूत १२ चौकारांसह ८४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. राहुल माघारी परतल्यानंतर शार्दुल ठाकूरलाही अँडरसनने शून्यावर माघारी धाडले. त्यानंतर रवींद्र जडेजाने आपले अर्धशतक फलकावर लावले. जडेजा ५६ धावांवर असताना रॉबिन्सनने त्याला ब्रॉडकरवी झेलबाद केले. जडेजाने ८ चौकार आणि एका षटकाराची आतषबाजी खेळी केली. त्यानंतर जसप्रीत बुमराहने आक्रमक फटकेबाजी करत २८ धावा जोडल्या. रॉबिन्सनने त्याला बाद करत भारताचा डाव संपुष्टात आणला. त्याने ८५ धावांत ५ तर अँडरसनने ५४ धावांत ४ बळी घेतले.

इंग्लंडचा पहिला डाव

पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत इंग्लंडला थक्क केले. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी या भारताच्या वेगवान गोलंदाजांसमोर इंग्लंडचा संघ १८३ धावांत सर्वबाद झाला. जो रूटने ११ चौकारांसह ६४ धावांची खेळी केली. जसप्रीत बुमराहने जेम्स अँडरसनची दांडी गुल करत इंग्लंडचा डाव संपवला. त्याने ४६ धावांत ४ बळी घेतले. मोहम्मद शमीला ३ आणि शार्दुल ठाकूरला २ बळी घेता आले.