विशाखापट्टणम : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पराभव पत्करावा लागल्यानंतर फलंदाजी आणि एकूण नियोजनावर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी दुसऱ्या कसोटीत इंग्लंडच्या आक्रमकतेला चतुराईने अर्थात अधिक विचारपूर्वक तोंड देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात १९० धावांच्या पहिल्या डावातील आघाडीनंतरही भारताला सामना २८ धावांनी गमवावा लागला. घरच्या मैदानावर भारताचे पारडे जड मानले जात असताना देखील इंग्लंडने आपल्या ‘बॅझबॉल’ रणनीतीचा खुबीने वापर करून भारताला पराभूत केले. यात दुसऱ्या डावात ऑली पोपच्या १९६ धावांच्या खेळीचा प्रमुख वाटा होता.

हेही वाचा >>> भारतीय फलंदाजांचा फिरकीविरुद्ध कसून सराव

मालिकेतील दुसरा कसोटी क्रिकेट सामना शुक्रवारपासून सुरू होत आहे. भारतीय संघाच्या नियोजनाविषयी बोलताना राठोड म्हणाले,‘‘भारतीय संघात असे युवा फलंदाज आहेत की जे कसोटी क्रिकेट फार कमी खेळले आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत निर्णय घेताना संयमी भूमिका घ्यायला हवी. शुभमन गिल, श्रेयस अय्यर, यशस्वी जैस्वाल हे फलंदाज गुणवान आहेत. त्यांच्याकडून धावा होतील याची आम्हाला खात्री आहे,’’असे बुधवारच्या सराव सत्रानंतर आयोजित पत्रकार परिषदेत राठोड यांनी सांगितले.

हेही वाचा >>> मुंबई इंडियन्सचे ‘हे’ प्रताप तुम्ही वाचलेत का?

जैस्वालने पहिल्या डावात ८० धावांची खेळी केली असली, तरी गिल आणि अय्यर दोन्ही डावांत प्रभाव पाडू शकलेले नाहीत. गिल आणि अय्यर यांनी अनुक्रमे आतापर्यंत २१ आणि १३ कसोटी सामने खेळले आहेत. गिल तर गेल्या ९ सामन्यांतून एकदाही अर्धशतक झळकावता आले  नाही. अय्यर पूर्णपणे अपयशी आहे. ‘‘आंतरराष्ट्रीय स्तर लक्षात घेता या सगळया गोष्टी बरोबर आहेत. सलग दुसऱ्या सामन्यात विराटशिवाय खेळावे लागणार आहे. अशा वेळी संधी मिळालेल्या फलंदाजांकडून धावा होण्याची आवश्यकता आहे. ठोस सकारात्मक मानसिकतेने खेळणे आणि आक्रमक खेळणे यात मोठा फरक आहे. कसे खेळायचे हे निश्चित असावे. खेळाडूंनी ठोस उद्दिष्ट डोळयासमोर ठेवून खेळावे अशी आमची इच्छा आहे,’’ असे राठोड म्हणाले.

फलंदाजांच्या कामगिरीत सुधारणेला वाव

भारतीय फलंदाज गुणवान असले, तरीही त्यांच्या खेळात सुधारणेला नक्कीच वाव आहे, असे राठोड म्हणाले. खेळपट्टीचे स्वरूप आणि सामन्याची परिस्थिती पाहून निर्णय घेणे आवश्यक आहे. खेळपट्टीवर परिस्थिती लक्षात घेऊन कसे सुरक्षित खेळता येईल या विचारांचा अभाव दिसून येत आहे. यासाठीच फलंदाजांनी अधिक विचारपूर्वक  खेळण्याची गरज असल्याचे राठोड यांनी सांगितले. ‘‘ आमचे फलंदाज पारंपरिक पद्धतीने खेळले.  इंग्लंडच्या फलंदाजांनी ‘स्विप’चा चांगला वापर केला. तो आमच्या फलंदाजांना जमला नाही. त्यासाठी ‘स्विप’चा विशेष सराव आवश्यक आहे,’’ असे राठोड म्हणाले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs england 2nd test coach vikram rathore responds on indian batting performance zws