दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसावर भारतीय फलंदाजांचं वर्चस्व दिसून आलं. भारतानं पहिल्या दिवसखेर ३ गडी गमवत २७६ धावांची खेळी केली. या खेळीत केएल राहुलचं शतक आणि रोहित शर्माच्या अर्धशतकी खेळीचा समावेश आहे. केएल राहुल १२७ धावांवर खेळत आहे. तर अजिंक्य रहाणे १ या धावसंख्येवर आहे. केएल राहुलने २१२ चेंडूत शतक केलं. तर रोहित शर्माने १४५ चेंडूत ८३ धावांची खेळी केली. या खेळीत ११ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. रोहित शर्माचं शतक १७ धावांनी हुकलं. रोहित शर्मा आणि केएल राहुल जोडी मैदानात तग धरून होती. पहिल्या गड्यासाठी दोघांनी १२७ धावांची खेळी केली. मात्र जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन रोहित शर्मा तंबूत परतला. त्यानंतर चेतेश्वर पुजारा मैदानावर जास्त वेळ तग धरू शकला नाही. त्याने २३ चेंडूत ९ धावा केल्या. अँडरसनच्या गोलंदाजीवर जॉनी बेअरस्टोने त्याचा झेल घेत तंबूत पाठवलं. त्यानंतर केएल राहुलला कर्णधार विराट कोहलीने चांगली साथ दिली. दोघांनी ११४ धावांची भागिदारी केली. विराट कोहली ४२ धावा करून बाद झाला.

केएल राहुलचं कसोटी कारकिर्दीतलं सहावं शतक आहे. केएल राहुलनं मैदानात तग धरत इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. त्याने २१२ चेंडू खेळत शतक ठोकलं. शतकी खेळी करत त्याने विरोधकांची तोंडं बंद केली आहेत. दोन वर्षे कसोटी क्रिकेटपासून दूर असणाऱ्या केएल राहुलनं आपल्या कारकिर्दीतलं सहावं शतक ठोकलं. त्याने ३ वर्षानंतर कसोटीत शतक झळकावलं आहे. यापूर्वी २०१८ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर असताने त्याने शतकी खेळी केली होती. ओवल मैदानात त्याने १४९ धावांची खेळी केली होती.

रोहित शर्मा आणि केएल राहुल या जोडीनं आघाडीला येत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. या जोडीनं पहिल्या गड्यासाठी अर्धशतकी भागिदारी केली. या जोडीनं ६९ वर्षानंतर लॉर्ड्सवर ही कामगिरी केली.१९५२ साली पहिल्यांदा भारताच्या आघाडीच्या जोडीनं कसोटीत अर्धशतकी भागिदारी केली होती.

या कसोटीवरही पावसाचं सावट आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे नाणेफेकीला विलंब झाला. विलंबानंतर झालेली नाणेफेक इंग्लंडनं जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारतानं दुसऱ्या कसोटी सामन्यात शार्दुल ठाकुरऐवजी इशांत शर्माला संधी दिली आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील विजय भारताच्या हातून पावसाने हिरावून नेला होता. त्यामुळे मालिकेत अद्याप कोणत्याही संघाला आघाडी नाही. त्यामुळे दुसरा कसोटी सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे. लॉर्ड्सवर भारत आणि इंग्लंडदरम्यान एकूण १८ सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी १२ सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला आहे. तर भारताने फक्त दोन सामन्यात विजय मिळवला आहे. तर ४ सामने अनिर्णित ठरले आहेत. या मैदानात इंग्लंडचं विजयी टक्केवारी ही ६६ टक्के आहे. तर भारताची विजयी टक्केवारी ११ टक्के आहे. भारताला १९८६ आणि २०१४ सालात विजय मिळाले होते.

Ind Vs Eng Test: जेम्स अँडरसनचा विक्रम; कसोटीत अशी कामगिरी करणारा पहिला वेगवान गोलंदाज

पहिला सामना नॉटिंगहॅममध्ये खेळला गेला होता. शेवटच्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द झाला होता. सामन्याचा निकाल पावसामुळे येऊ शकला नाही आणि सामना अनिर्णित घोषित करण्यात आला. सामना अनिर्णित राहिल्यानंतर, दोन्ही संघांना २०२१-२३ च्या विश्व कसोटी चॅम्पियनशिपसाठी प्रत्येकी चार गुण देण्यात आले. मॅच रेफ्री ख्रिस ब्रॉड यांनी दोन्ही संघांनी षटकांची गती संथ राखल्याबद्दल दोषी ठरवले. त्यानंतर दोन्ही संघांच्या खात्यातून प्रत्येकी दोन गुण पेनल्टी ओव्हर म्हणून कापले गेले आणि आता दोघांचेही चारऐवजी प्रत्येकी दोन गुण आहेत. याशिवाय, दोन्ही संघांच्या खेळाडूंना सामना शुल्काच्या ४० टक्के दंड भरावा लागेल.

दोन्ही संघातील खेळाडू

भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

इंग्लंडचा संघ- जो रुट (कर्णधार), रोरी बर्नस, डोम सिबली, हसीब हमीद, जॉनी बेअरस्टो, मोईन अली, जोस बटलर, सॅम करन, ओली रॉबिनसन, जेम्स अँडरसन, मार्क वूड