Hotstar Ind vs Eng: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान, हॉटस्टारच्या अनेक प्रेक्षकांनी सोशल मीडियावर तांत्रिक बिघाडाची तक्रार केली. युजर्सनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट्सनुसार त्यांना हॉटस्टारवर त्यांच्या पसंतीनुसार स्ट्रीमिंग भाषा बदलता येत नव्हती. सर्वांना हिंदी हा एकमेव पर्यायच उपलब्ध होता.
हॉटस्टारवरील क्रिकेट सामने सामान्यतः इंग्रजी, हिंदी, मराठी, बंगाली, तमिळ आणि तेलगू यासह अनेक भाषांमध्ये स्ट्रीम केले जातात, ज्यामुळे भारतातासह जगभरातील चाहते त्यांच्या पसंतीच्या भाषेत समालोचनाचा आनंद घेऊ शकतात. पण, आजच्या सामन्यादरम्यान, अनेक प्रेक्षकांना डिफॉल्ट हिंदी फीडवरून स्विच करता आले नाही, ज्यामुळे एक्सवर युजर्सनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला.
एका युजरने याबाबत आपली निराशा व्यक्त करताना म्हटले की, “सामन्याची स्ट्रीमिंग भाषा बदलता येत नाही. याचबरोबर गुणवत्ताही खराब आहे. कॅशे क्लिअर करण्याचा प्रयत्न केला पण तरीही यामध्ये फरक पडला नाही.”
यानंतर आणखी एका युजरने त्यालाही ही समस्या येत असल्याचे म्हटले, “हॉटस्टारवर ऑडिओ फीड काम करत नाहीये, सध्या फक्त हिंदी फीड उपलब्ध आहे”.
पुढे आणखी एक युजर म्हणाला, “हॉटस्टारवर भाषेची सेटिंग बदलण्याची समस्या मला एकट्यालाच आहे का? मला हिंदी भाष्य नको आहे.”
दरम्यान गेल्या काही वर्षांमध्ये क्रिकेट सामन्यांचे इंग्रजी आणि हिंदीसह प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारण करण्यात येत आहे. त्यामुळे इंग्रजी आणि हिंदी न समजणारे प्रादेशिक प्रेक्षक मोठ्या प्रमाणात त्यांच्या भाषेमध्ये क्रिकेट सामने पाहणे पसंत करत आहेत. त्यामुळे आज हॉटस्टारील भाषेच्या समस्येमुळे अनेक प्रेक्षकांना याचा फटका बसल्याचे पाहायला मिळाले.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्याला आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरूवात झाली आहे. यामध्ये इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. डावाची ४४ षटके पूर्ण झाल्यानंतर भारताने ६ बाद ३०८ धावा केल्या आहेत. यात उपकर्णधार शुभमन गिलने ११२ धावांची शतकी खेळी केली आहे. तर श्रेयस अय्यर आणि विराट कोहलीने अनुक्रमे ७८ आणि ५२ धावांची अर्धशतकी खेळी आहे.