कोलकात्याच्या ईडन गार्डनवरील तिसऱ्या कसोटीच्या आज (गुरूवार) दुस-या दिवशी सकाळच्या सत्रातच इंग्लंडने यश मिळवत भारताचा पहिला डाव ३१६ धावांत आटोपला. काल (बुधवार) पहिल्या दिवशी भारताची इंग्लंडने ७ बाद २७३ अशी बिकट अवस्था केली. त्यानंतर आज सकाळी इंग्लंडच्या मॉन्टी पानेसरची फिरकी आणि जेम्स अँडरसनच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अर्धशतक झळकावून डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र वेगवान गोलंदाज स्टिवन फिनने धोनीला ५२ धावांवर झेलबाद करीत भारताचा डाव ३१६ धावांवरच गुंडाळला.
आज सकाळच्या सत्रात शेवटच्या फळीतील भारतीय खेळाडूंना अवघ्या ४३ धावांची भर घालता आली. झहीर खानला सहा धावांवर आणि इशांत शर्मा फक्त मैदानावर हजेरी लावून तंबूत परतले. इंग्लंडच्या माँटी पानेसरने पुन्हा एकदा कमाल दाखवत ४० षटकांमध्ये ९० धावा देत चार बळी, जेम्स अँडरसनने ८९ धावांच्या बदल्यात ३ बळी आणि स्वान व फिनने प्रत्येकी एक बळी घेतला. भारताचा सलामीवीर गौतम गंभीर, सचिन तेंडुलकर आणि काही अंशी महेंद्रसिंग ढोणीचा अपवाद वगळता भारताच्या एकाही फलंदाजाला पहिल्या डावात ईडन गार्डनवर आपली चमक दाखवता आली नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा