राजकोट : मधल्या फळीतील प्रमुख फलंदाजांच्या दुखापती आणि माघारीमुळे भारतीय संघाला आज, गुरुवारपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात नवोदित फलंदाजांवर अवलंबून राहावे लागणार आहे. मुंबईकर फलंदाज सर्फराज खान आणि यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेल यांना या सामन्यात कसोटी पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. या दोघांसह भारताच्या मधल्या फळीतील अननुभवी फलंदाजांची इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर कसोटी लागेल.

हैदराबाद येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवाच्या धक्क्यातून सावरत भारताने विशाखापट्टणम येथे झालेला दुसरा सामना मोठ्या फरकाने जिंकला. यासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. त्यामुळे आता राजकोट येथे होणारा तिसरा सामना जिंकत मालिकेत आघाडी मिळवण्याची दोन्ही संघांना संधी आहे. मात्र, या सामन्यापूर्वी भारतीय संघासमोर फलंदाजीबाबत काही प्रश्न उपस्थित राहिले आहेत.

तारांकित फलंदाज विराट कोहलीने उर्वरित मालिकेतूनही माघार घेतली असून जायबंदी केएल राहुल दुसऱ्या कसोटीपाठोपाठ तिसऱ्या कसोटीलाही मुकणार आहे. त्यातच गेल्या काही काळातील निराशाजनक कामगिरीनंतर श्रेयस अय्यरलाही कसोटी संघातून वगळण्यात आले. त्यामुळे आता भारताच्या मधल्या फळीची भिस्त नवोदित फलंदाजांवर असणार आहे.

हेही वाचा >>> बंदी उठवण्यासाठी भ्रष्ट मार्गाचा अवलंब; साक्षी, बजरंगचा भारतीय कुस्ती महासंघावर आरोप; नव्याने आंदोलनाचा इशारा

गेल्या सामन्यात कसोटी पदार्पण केलेला रजत पाटीदार चौथ्या क्रमांकावर खेळण्याची दाट शक्यता आहे. पाचव्या क्रमांकासाठी सर्फराज आणि देवदत्त पडिक्कल यांच्यात स्पर्धा आहे. मात्र, सर्फराज गेल्या सामन्यासाठीही चमूमध्ये असल्याने सध्या अंतिम ११ मध्ये स्थान मिळवण्यासाठी त्याचे पारडे जड दिसत आहे. दुखापतीमुळे गेल्या सामन्याला मुकलेल्या रवींद्र जडेजाचे पुनरागमन अपेक्षित आहे. तो सहाव्या क्रमांकावर खेळेल. यष्टिरक्षक-फलंदाज केएस भरत पहिल्या दोन कसोटीत अपयशी ठरल्याने त्याच्या जागी जुरेलला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास तो सातव्या क्रमांकावर फलंदाजी करेल. जडेजा वगळता मधल्या फळीतील हे सर्वच फलंदाज आंतरराष्ट्रीय पातळीवर अगदीच नवखे आहेत. त्यामुळे घरच्या मैदानावर खेळणाऱ्या जडेजावरील जबाबदारी वाढणार आहे.

राजकोट येथील खेळपट्टी ही फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते आणि अखेरच्या दोन दिवसांत फिरकीपटूंना मदत मिळते. या सामन्याची खेळपट्टीही तशीच असल्यास जडेजा आणि रविचंद्रन अश्विन या अनुभवी फिरकीपटूंची भूमिका निर्णायक ठरू शकेल. तसेच चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव आणि डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल यांच्यापैकी कोणाला अंतिम ११ खेळाडूंत स्थान मिळते हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल.

हेही वाचा >>> ‘ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी रोहितच कर्णधार’

दुसरीकडे, इंग्लंडच्या संघाचा प्रयत्न दमदार पुनरागमनाचा असेल. पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावातील मोठी पिछाडी भरून काढताना इंग्लंडने विजय मिळवला होता. दुसऱ्या कसोटीत मात्र इंग्लंडला ते शक्य झाले नाही. त्यामुळे आता राजकोट कसोटीत पहिल्या डावात अधिक चांगली कामगिरी करून भारतीय संघावर दडपण आणण्याचा इंग्लंडचा मानस असेल. त्यासाठी मधल्या फळीतील फलंदाज आणि फिरकीपटूंनी आपली कामगिरी उंचावणे आवश्यक असेल.

संघ

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, केएस भरत (यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमरा (उपकर्णधार), मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप, देवदत्त पडिक्कल.

इंग्लंड (अंतिम ११) : बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (यष्टिरक्षक), रेहान अहमद, टॉम हार्टली, जेम्स अँडरसन, मार्क वूड.

आघाडीच्या फळीवर अधिक जबाबदारी

सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल यांनी अद्याप एकही कसोटी सामना खेळलेला नसून रजत पाटीदारला केवळ एका कसोटीचा अनुभव आहे. मधल्या फळीतील या नवोदित फलंदाजांवरील दडपण कमी करण्याची जबाबदारी कर्णधार रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल या आघाडीच्या फळीतील फलंदाजांवर असेल. यशस्वीने गेल्या सामन्यात आपल्यातील अलौकिक प्रतिभेला न्याय देताना अप्रतिम द्विशतक साकारले होते. तसेच दडपणाखाली असलेल्या गिलने दुसऱ्या डावात शतकी खेळी केली होती. या दोघांनी कामगिरीत सातत्य राखणे गरजेचे आहे. रोहितने पहिल्या दोन कसोटी सामन्यांच्या चार डावांत अनुक्रमे २४, ३९, १४ आणि १३ धावा केल्या. त्याने खेळ उंचावणे आणि मोठी खेळी करणे भारताच्या दृष्टीने महत्त्वाचे झाले आहे.

इंग्लंड संघात दोन वेगवान गोलंदाज

पहिल्या दोन कसोटीत इंग्लंडने तीन फिरकीपटू आणि एका वेगवान गोलंदाजासह खेळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडने आपल्या योजनांत थोडा बदल केला असून दोन फिरकीपटू आणि दोन वेगवान गोलंदाजांना संघात स्थान दिले आहे. जेम्स अँडरसन आणि मार्क वूड हे दोनही प्रमुख वेगवान गोलंदाज या सामन्यात खेळताना दिसतील. फिरकीची धुरा डावखुरा टॉम हार्टली आणि लेग-स्पिनर रेहान अहमद सांभाळतील. शोएब बशीरला वगळण्यात आले आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सची ही शतकी कसोटी असेल.