सिद्धार्थ खांडेकर – response.lokprabha@expressindia.com

ऑस्ट्रेलियाविरुद्ध काहीसा अनपेक्षित दिग्विजयी दौरा करून परतलेल्या भारतीय संघासमोर लवकरच नवे आव्हान उभे राहिले आहे, ते इंग्लंडच्या रूपात. हा लेख प्रसिद्ध होईपर्यंत इंग्लंडविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झालेली असेल. दोन सामने चेन्नईत, दोन सामने अहमदाबादेत ज्यांतील एक सामना दिवसरात्र असा कसोटी कार्यक्रम; तीन एकदिवसीय सामने पुण्यात आणि पाच टी-२० सामने अहमदाबादेत असा मर्यादित षटकांच्या सामन्यांचा कार्यक्रम आहे. प्रस्तुत लेखामध्ये कसोटी मालिकेविषयीच विश्लेषण आहे, कारण मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये दोन्ही संघांचे बलाबल समसमान दिसते. कसोटी मालिकेमध्ये जवळपास पूर्णपणे तंदुरुस्त भारतीय संघाची बाजू वरचढ दिसते; पण दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. सध्या भारतीय दौऱ्यावर आलेला इंग्लिश संघ ऑस्ट्रेलियन संघापेक्षा अधिक लवचीक आणि वैविध्यपूर्ण आहे आणि पारडे जड असले, तरी ती मालिका विजयाची हमी नसते, हे ऑस्ट्रेलिया-भारत कसोटी मालिकेतून दिसून आलेच आहे! किंबहुना, या मालिकेत जिंकण्याची अपेक्षा आणि म्हणून दडपण भारतावर अधिक राहील, ज्याच्या पूर्णपणे विपरीत परिस्थिती ऑस्ट्रेलियात होती. सामन्यागणिक भारताचे एक-दोन क्रिकेटपटू जायबंदी होत होते. तशात पूर्ण शक्तिमान फलंदाजीची फळीही पहिल्याच सामन्यात दुसऱ्या डावात ३६ धावांमध्ये गारद झाली होती. अ‍ॅडलेडमधील त्या सामन्यानंतर मेलबर्न, सिडनी आणि ब्रिस्बेन या प्रत्येक सामन्याआधी भारतीय संघ हरणार अशीच भाकिते वर्तवली गेली, परंतु तसे घडले नाही. अजिंक्य रहाणेचे कुशल नेतृत्व आणि त्याच्या जिगरबाज सहकाऱ्यांनी प्रत्येक अडचणीतून मार्ग काढला आणि पुन्हा पराभव होऊ दिला नाही. त्या संस्मरणीय विजयाच्या कौतुकवर्षांवातून बाहेर येऊन इंग्लंडशी मुकाबला करावा लागेल. श्रीलंकेतील कसोटी मालिकेत निर्भेळ यश मिळवल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. फिरकीचा प्रभाव असलेल्या खेळपट्टय़ांवर खेळण्याचा सराव झालेला आहे. शिवाय भारताप्रमाणेच इंग्लंडकडेही गुणवान खेळाडूंची वानवा नसल्यामुळे ‘रोटेशन’ धोरण अवलंबून अधिकाधिक जणांना ताजेतवाने ठेवणे पाहुण्यांना साध्य झालेले आहे. या सगळ्या बाबींचा विचार केल्यास ही मालिका जिंकणे नक्कीच आव्हानात्मक ठरेल. त्यामुळेच मालिकेची खुमारी वाढलेली आहे हे मात्र नक्की.

गेल्या दशकात भारतात भारताला हरवणारा एकमेव संघ म्हणजे इंग्लंड. भारतात त्यांनी आतापर्यंत तीन वेळा मालिका जिंकलेल्या आहेत. सत्तरच्या दशकात टोनी ग्रेग, ऐंशीच्या दशकात डेव्हिड गॉवर आणि गत दशकात अ‍ॅलिस्टर कुक यांच्या संघांनी विजय मिळवले, परंतु भारतीय खेळपट्टय़ांवर फिरकी खेळणे बहुतेक इंग्लिश फलंदाजांना नेहमीच जड जाते हा अनुभव. २०१६ मध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका भारताने ४-० अशी आरामात जिंकली. चारही विजय दणदणीत होते. त्यांतल्या त्यात राजकोटमधील पहिल्या सामन्यातच इंग्लंडने थोडीफार लढत दिली व सामना अनिर्णित राखला. सध्याच्या इंग्लिश संघातील काही जण त्या वेळीही खेळत होते. विद्यमान कर्णधार जो रूट, जॉस बटलर, बेन स्टोक्स, जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड त्या मालिकेत खेळले. हे सर्व जण गेल्या पाच वर्षांत नि:संशय अधिक परिपक्व झालेले आहेत. जैवसुरक्षेच्या परिघात खेळावे लागल्याचा फटका दोन्ही संघांना समसमान बसणार आहे; पण भारताप्रमाणेच इंग्लिश संघाकडेही चांगल्या राखीव खेळाडूंची संख्या मोठी असल्यामुळे मोजक्याच खेळाडूंवरील भार वाढणार नाही आणि ताज्यातवान्या खेळाडूंचा पुरवठा होत राहील. चार सामन्यांच्या मोठय़ा मालिकेत ही विशेषत: गोलंदाजांच्या बाबतीत अत्यावश्यक बाब ठरते.

२०१२ मधील त्या मालिकेनंतरच्या काळातील घरच्या मैदानावरील भारताची कामगिरी फारच बिनतोड ठरली. या काळात हा संघ ३४ कसोटी सामने खेळला, त्यांतील २८ सामन्यांमध्ये विजयी ठरला. चार वर्षांपूर्वी पुण्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धचा एकमेव पराभव वगळल्यास इतर कोणत्याही संघाशी आपण पराभूत झालेलो नाही. इंग्लंडचा संघही सलग सहा परदेशी मैदानावरील सामने जिंकून भारतात आला आहे. इंग्लंडच्या संघात जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्स यांचे पुनरागमन होत आहे. जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड या अनुभवी गोलंदाजांमुळे त्यांना अधिक आत्मविश्वास मिळाला असेल; परंतु डॉम बेस आणि जॅक लीच या फिरकीपटूंनी मोठय़ा संघांविरुद्ध चमक दाखवलेली नाही. या दोघांनी मिळून श्रीलंकेचा संघ एका डावात गुंडाळून दाखवला, तरी भारतीय फलंदाजांविरुद्ध त्यांना उच्च दर्जाची कामगिरी सातत्याने करावी लागेल. फिरकी गोलंदाजी या एकमेव आघाडीवर इंग्लंडची बाजू भारतासमोर फारच दुबळी दिसते. रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव आणि (गरज पडल्यास) अक्षर पटेल आणि मालिकेत नंतर रवींद्र जडेजा यांचा दर्जा बेस, लीच आणि कदाचित मोईन अली यांच्या खूपच वरचा आहे. इंग्लिश फलंदाजांपैकी केवळ रूटच फिरकी उत्तम खेळू शकतो.   त्याच्या फलंदाजीतील  सरासरी इतर ठिकाणांपेक्षा आशियामध्ये अधिक आहे; पण इतर फलंदाज – रोरी बर्न्‍स, डॉम सिब्ली, ऑली पोप, डॅन लॉरेन्स, बेन स्टोक्स, जॉस बटलर, मोईन अली यांना तशी चमक दाखवता आलेली नाही. फिरकी गोलंदाजी ही इंग्लिश फलंदाजांची ठसठस भारतात नेहमीच दिसून आली आहे. चेन्नईपेक्षा अहमदाबादमध्ये इंग्लंडला अधिक आशा बाळगता येऊ शकतात, कारण अहमदाबादच्या खेळपट्टीवर अधिक हिरवळ असते, शिवाय तेथील एक कसोटी दिवसरात्र असून गुलाबी चेंडूच्या बाबतीत आपण दर्जेदार गोलंदाजांविरुद्ध अजूनही समाधानकारक खेळू शकत नाही हे ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकतेच दिसून आले आहे. चेन्नईतील नवोदित क्युरेटरने चेपॉकच्या खेळपट्टीवर बऱ्यापैकी गवत राखल्याचे वृत्त आहे. तसे असल्यास इंग्लंडच्या आशा थोडय़ाफार पल्लवित होतील; पण ती शक्यता धूसर आहे. शिवाय गेल्या काही वर्षांतील भारतीय संघाचे प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे भारतीय खेळपट्टय़ांवर उत्तम कामगिरी करतील असे चांगले मध्यमतेज गोलंदाज आपल्याकडे निर्माण होऊ लागले आहेत. जसप्रित बुमरा पुन्हा तंदुरुस्त आहे. इशांत शर्मा परतलाय. मोहम्मद सिराजचा आत्मविश्वास ऑस्ट्रेलियातील कामगिरीमुळे दुणावला आहे. शार्दूल ठाकूरही उत्तम गोलंदाजी करू शकतो.

रोहित, शुभमन, पुजारा, कोहली, रहाणे, पंत ही फळी मजबूत दिसते. या फळीत हार्दिक पंडय़ाचा समावेश झाल्यास (जी शक्यता कमी, कारण अजून तो पुरेशा क्षमतेने गोलंदाजी करू शकत नाही.) ती दीर्घ बनते. बुमरा, अश्विन, इशांत यांची निवड नक्की आहे. पाच गोलंदाजांचा ‘रहाणे फॉम्र्युला’ वापरायचा की सहा फलंदाज खेळवून धावांच्या बोज्याखाली प्रतिस्पध्र्याला नेस्तनाबूत करायचे याविषयी निर्णय घ्यावा लागेल. गंमत म्हणजे तो घेणे भारतासाठी सोपे नाही. एरवी इतर कोणत्याही संघाविरुद्ध तो घेणे अवघड नव्हते; पण इंग्लंडच्या संघात सामना फिरवू शकतील असे गोलंदाज (अँडरसन, ब्रॉड, आर्चर) आणि फलंदाज (रूट, स्टोक्स, बटलर) आहेत. त्यामुळे निष्कारण अति आत्मविश्वासाच्या लाटेवर स्वार न होता, परिस्थितीनुरूप निर्णय घ्यावे लागतील. वर म्हटल्याप्रमाणे इंग्लंडला सर्वाधिक संधी अहमदाबादेतील दिवसरात्र सामन्यातच आहे; पण काही तरी चमत्कार घडून त्यांनी चेन्नईचा पहिला सामना जिंकला, तर मात्र अनेक ठोकताळे उलटेपालटे होऊ शकतात; पण.. चमत्कार ऑस्ट्रेलियात अलीकडेच दिसून आलेत ना. इतक्या लवकर त्यांची पुनरावृत्ती होईल? कुणी सांगावं?
सौजन्य – लोकप्रभा