कार्डिफ येथे खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडने भारतावर ५ गडी राखून मात करत, ३ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. भारताने दिलेल्या १४९ या धावसंख्येचा पाठलाग करताना अॅलेक्स हेल्स हा इंग्लंडसाठी हिरो ठरला. अॅलेक्सने नाबाद अर्धशतकी खेळी केली. सामन्याच्या अखेरच्या षटकात भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर अॅलेक्स हेल्सने जोरदार हल्ला चढवत आपला विजय निश्चीत केला. भारताचे फिरकी गोलंदाज दुर्दैवाने इंग्लंडच्या फलंदाजांवर नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरले. विराट कोहलीनेही सामना संपल्यानंतर, इंग्लंडच्या संघाने कुलदीपच्या गोलंदाजीचा अभ्यास केल्याचं बोलून दाखवलं. भारताच्या गोलंदाजांविरुद्ध त्यांनी जी तयारी केली त्याचा त्यांना फायदा झाला असं म्हणत विराटने कालच्या सामन्यात इंग्लंड सरस ठरल्याचं सांगितलं.
अवश्य वाचा – अॅलेक्स हेल्सची वादळी खेळी, इंग्लंड ५ गडी राखून विजयी! मालिकेत १-१ ने बरोबरी
“पहिल्या ६ षटकांमध्ये ३० धावांच्या मोबदल्यात तुम्ही ३ बळी गमावता तेव्हा सामन्यात पुनरागमन करणं थोडं कठीण होऊन बसतं. मधल्या काळात झालेल्या भागीदारीमुळे आम्ही १४० च्या पुढचा पल्ला गाठला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी परिस्थितीचा चांगला फायदा उचलला. कार्डिफच्या मैदानावर चेंडू उसळी घेत होता, त्यामुळे पहिल्या ६ षटकांमध्ये आम्ही पुरते बॅकफूटला ढकलले गेलो. त्यामुळे आम्ही दिलेलं १४९ धावांचं आव्हान हे पुरेसं नव्हतं. कुलदीपसाठी इंग्लंडचे फलंदाज अभ्यास करुन मैदानात उतरले होते व ते मैदानात आम्हाला जाणवत होतं. या गोष्टीचा त्यांना नक्कीच फायदा झाला.” विराटने भारताच्या पराभवावर आपलं विश्लेषण केलं.