विशाखापट्टणम : पहिल्या कसोटीतील पराभव आणि त्यानंतर काही प्रमुख खेळाडूंना झालेल्या दुखापतींचा भारतीय संघाच्या आत्मविश्वासावर परिणाम झालेला नाही. आम्ही इंग्लंडच्या आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी नव्या योजना आखल्या आहेत. तसेच फिरकीपटूंविरुद्ध ‘स्विप’चा फटका मारून सकारात्मक खेळ करण्यासाठी आमचे फलंदाज सज्ज असल्याची प्रतिक्रिया भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज केएस भरतने दुसऱ्या कसोटीच्या पूर्वसंध्येला गुरुवारी व्यक्त केली. भरतला या सामन्यात आपल्या घरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे चांगल्या कामगिरीसाठी तो उत्सुक आहे. तसेच पहिल्या कसोटीतील पराभवाला मागे सारून भारतीय संघ दमदार कामगिरीसाठी पूर्णपणे तयार असल्याचेही भरतने नमूद केले.
हेही वाचा >>> Ind vs Eng: शोएब बशीरला पदार्पणाची संधी; ४१वर्षीय जेम्स अँडरसनही खेळणार
‘‘पहिल्या कसोटीत कोणत्या गोष्टी आम्हाला अधिक चांगल्याप्रकारे करता आल्या असत्या याबाबत आम्ही संघाच्या बैठकींमध्ये चर्चा केली आहे. आम्ही नव्याने काही योजना आखल्या आहेत. पहिल्या कसोटीत इंग्लंडने केलेल्या खेळाचा आम्ही अभ्यास केला. त्यांनी ‘स्विप’ आणि विशेषत: ‘रिव्हर्स स्विप’चा उत्तम वापर केला. आम्हीही या फटक्यावर काम केले आहे,’’ असे भरतने सांगितले. भारतीय फलंदाज सामान्यत: ‘स्विप’चा फारसा वापर करत नाहीत. मात्र, दुसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय फलंदाज या फटक्यावर विशेष मेहनत घेताना दिसले. याबाबत विचारले असता भरत म्हणाला, ‘‘भारतामधील खेळपट्टया फिरकीला अनुकूल असतात. त्यामुळे फलंदाज म्हणून तुम्हाला विविध फटके मारण्याचा सराव असणे गरजेचे आहे. आम्ही ‘स्विप’ किंवा ‘रिव्हर्स स्विप’चा फटका मारू शकत नाही असे नाही. मात्र, आमचे फलंदाज परिस्थितीनुसार फटक्यांची निवड करतात. आम्ही ‘रिव्हर्स स्विप’चा खूप सराव केला आहे. परंतु सामन्यादरम्यान हा फटका मारायचा की नाही, हा प्रत्येक फलंदाजाचा वैयक्तिक निर्णय असेल.’’