नागपूर : भारतीय संघ गुरुवारपासून इंग्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेत चॅम्पियन्स करंडकासाठी योग्य संयोजन तयार करण्यावर भर देईल. यासह काही शीर्ष खेळाडूंची लय व तंदुरुस्ती यावरही नजर असेल.

कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहलीसारखे खेळाडू गेल्या काही काळापासून धावा करण्यासाठी झुंजताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून कामगिरी उंचावणे अपेक्षित असेल. या दोन्ही तारांकित फलंदाजांनी रणजी करंडकातही सहभाग नोंदवला होता. मात्र, त्यांना धावा करता आल्या नाहीत. आता ते आपल्या आवडत्या एकदिवसीय प्रारूपात खेळणार आहेत. या दोन्ही खेळाडूंनी भारतात २०२३ मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात चांगली कामगिरी केली होती. कोहलीने स्पर्धेत ७६५ धावा केल्या होत्या. तर, रोहितने ५९७ धावांचे योगदान दिले होते. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर हे दोन्ही खेळाडू श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत सहभागी झाले होते. रोहितने या मालिकेत दोन अर्धशतके झळकावली. तर, कोहलीला विशेष कामगिरी करता आली नाही. कसोटी क्रिकेटमध्येही या दोघांची निराशाजनक कामगिरी सुरू राहिली. त्यामुळे त्यांच्या भवितव्याबाबत चर्चेला उधाण आले. इंग्लंडविरुद्धची मालिका पाकिस्तान व दुबईमध्ये १९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स करंडकापूर्वी अखेरची स्पर्धा असेल. रोहित व विराटच्या कारकीर्दीच्या दृष्टीने चॅम्पियन्स करंडक स्पर्धा ही महत्त्वाची आहे.

पंत की राहुल?

ऋषभ पंत आणि केएल राहुलपैकी कोणाला यष्टिरक्षणाची जबाबदारी द्यायची याचा पेच संघ व्यवस्थापनासमोर असेल. रोहित व उपकर्णधार शुभमन गिल डावाची सुरुवात करतील. यानंतर कोहली व श्रेयस अय्यर येतील. त्यामुळे यष्टिरक्षक फलंदाजाला पाचव्या स्थानी उतरवण्याची शक्यता आहे. यानंतर हार्दिक पंड्याचा क्रमांक येतो. पंतच्या अनुपस्थितीत एकदिवसीय विश्वचषकात राहुलने यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळली होती आणि ४५२ धावा केल्या होत्या. त्याच्या उपस्थितीत संघ संयोजन चांगले तयार झाले होते. भारतीय फलंदाजी क्रमवारीत डावखुरा पंत हा वेगळेपण आणतो. यासह तो आक्रमक फलंदाजी करतो आणि त्यामुळेच तो संघासाठी निर्णायक ठरू शकतो. भारतीय संघ व्यवस्थापन या दोघांनाही एकत्र संधी देऊ शकतो. मात्र, त्यासाठी अय्यरला बाहेर बसावे लागू शकते. अय्यरने एकदिवसीय प्रारूपात नेहमीच संघासाठी योगदान दिले आहे.

शमी, कुलदीपवर नजर

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि चायनामन कुलदीप यादवला सरावाची संधी मिळणार आहे. हे दोन्ही गोलंदाज दुखापतीतून पुनरागमन करत आहेत. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा पाठीच्या दुखापतीमुळे मालिका खेळत नाही. इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत चमक दाखवणाऱ्या वरुण चक्रवर्तीचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. त्याला एकदिवसीय पदार्पणाची संधी मिळू शकते. त्याने चांगली कामगिरी केल्यास चॅम्पियन्स करंडकाच्या संघातील आपली दावेदारी तो भक्कम करू शकतो. संघ व्यवस्थापनाला अष्टपैलूबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. या स्थानासाठी रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर शर्यतीत आहे.

माझ्या कारकीर्दी बाबतची चर्चा थांबवा

इंग्लंडविरुद्धची तीन सामन्यांची मालिका व ‘आयसीसी’ चॅम्पियन्स करंडकामध्ये चांगली कामगिरी करण्याकडे आमचे लक्ष असतानी आपल्या कारकीर्दीबाबत चर्चा करण्याची ही योग्य वेळ नाही, असे भारताचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला. ‘‘एकदिवसीय मालिका आणि चॅम्पियन्स करंडकाचे आयोजन होणार आहे. त्यामुळे माझ्या भविष्यातील योजनांबाबत चर्चा करण्याची ही योग्य वेळ नाही. माझ्या भवितव्याबाबत अनेक वर्षे चर्चा सुरू आहे आणि त्याबाबत स्पष्टीकरण देण्याकरता ही मी येथे आलेलो नाही. माझ्यासाठी इंग्लंडविरुद्धचे तीन सामने आणि चॅम्पियन्स करंडक महत्त्वाचे आहेत. त्यामुळे सध्या माझे लक्ष्य या सामन्यांवर आहे. यानंतर काय होईल ते पाहू,’’ असे रोहित पत्रकार परिषदेत म्हणाला. आपण भविष्यातील स्पर्धेवर लक्ष केंद्रीत करत असल्याचे रोहितने सांगितले. तो म्हणाला,‘‘हे वेगळे प्रारूप आहे. क्रिकेटपटू म्हणून चढ-उतार येणार आहेतच आणि माझ्या कारकीर्दीत या गोष्टींना सामोरे गेलो आहे. ही माझ्यासाठी नवीन गोष्ट नाही. पुढे काय होणार आहे, याकडे माझे लक्ष आहे. या मालिकेची सुरुवात चांगल्या पद्धतीने करण्याचा माझा प्रयत्न आहे.’’

बुमरा नसल्यास भारताच्या कामगिरीवर परिणाम -शास्त्री

दुबई : आगामी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा सहभागी न झाल्यास भारतीय संघाच्या कामगिरीवर निश्चितपणे परिणाम होणार, असे मत भारताचे माजी कर्णधार आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत अगदी अखेरच्या क्षणी बुमराची पाठदुखी बळावली. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी बुमराचा समावेश संघात करण्यात आला असला, तरी तंदुरुस्तीवर त्याचे खेळणे अवलंबून असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. ‘‘बुमरा हा भारताचा प्रमुख खेळाडू आहे. त्याच्यासमोर आणखी बरेच क्रिकेट शिल्लक आहे. त्यामुळे दुखापतीनंतर बुमराला मैदानावर उतरविण्याची घाई करू नये,’’ असा सल्लाही शास्त्री यांनी दिला.

Story img Loader