इंग्लंड दौऱ्यावर कसोटी मालिका यजमानांनी जिंकली, तर एकदिवसीय मालिका भारताने. आता रविवारी होणाऱ्या एकमेव ट्वेन्टी-२० सामन्यात कोणता संघ बाजी मारतो, याकडे साऱ्यांचेच लक्ष असेल. ट्वेन्टी-२० साठी भारतीय संघात मोठे बदल नसले तरी काही महत्त्वपूर्ण बदलांमुळे हा सामना रंजक होण्याची अपेक्षा आहे.
ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये कोणताही संघ बाजी मारू शकतो. त्यामुळे भारताने एकदिवसीय मालिकेत विजय मिळवलेला असला तरी त्यांना गाफील राहून चालणार नाही. सुरेश रैना, अजिंक्य रहाणेसारखे फलंदाज चांगल्या फॉर्मात आहेत. पण विराट कोहलीला मात्र अजूनही सूर सापडलेला नाही आणि हीच भारतासाठी चिंतेची बाब असेल. गोलंदाजीमध्ये मोहम्मद शमी, आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली असून त्यांच्याकडून मोठय़ा अपेक्षा असतील.
इंग्लंडच्या एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० संघामध्ये बरेच महत्त्वपूर्ण बदल आहेत. संघाचे कर्णधार ईऑन मॉर्गनकडे असून त्याला एकदिवसीय मालिकेमध्ये छाप पाडता आली नव्हती. अनुभवी रवी बोपारा आणि टीम ब्रेसनन यांचे पुनरागमन संघासाठी फलदायी ठरू शकते. त्याचबरोबर जेसन रॉय आणि जेम्स टेलर या युवा खेळाडूंना संधी मिळते का, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.
ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये इंग्लंडपेक्षा भारताचेच पारडे जड दिसत आहे. भारतीय संघातील खेळाडूंना आयपीएलसहित आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे, तर दुसरीकडे इंग्लंडच्या संघात बरेच नवीन चेहरे आहेत. कर्णधाराच्या बदलाने इंग्लंडला सुयश मिळणार की भारत ट्वेन्टी-२० मधली आपली मक्तेदारी कायम राखणार, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा