वृत्तसंस्था, जॉर्जटाऊन

आक्रमक शैलीत फलंदाजी करून प्रतिस्पर्ध्यांना दडपणाखाली आणणाऱ्या भारतीय संघाची आज, गुरुवारी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्यांच्याइतकाच आक्रमक खेळ करणाऱ्या गतविजेत्या इंग्लंडशी गाठ पडणार आहे. २०२२ मध्ये झालेल्या गेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात हेच दोन संघ उपांत्य फेरीतच समोरासमोर आले होते. त्यावेळी इंग्लंडने भारताला १० गडी राखून धूळ चारली होती. आता त्या पराभवाची परतफेड करत अंतिम फेरी गाठण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.

ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे गेले पर्व आणि या पर्वातील भारतीय संघाच्या फलंदाजीच्या शैलीत फार मोठा बदल झाला आहे. गेल्या पर्वात सुरुवातीला सावध फलंदाजी करण्याचा भारताला फटका बसला होता. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने सर्व फलंदाजांना सुरुवातीपासून आक्रमक शैलीत खेळण्याची सूचना केली. त्याने स्वत:पासून या बदलाला सुरुवात केली. त्यामुळे भारतीय फलंदाज अधिक मोकळेपणाने खेळताना दिसत आहेत.

प्रॉव्हिडन्स स्टेडियम, गयाना येथे होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्याची खेळपट्टी फिरकीला अनुकूल असणे अपेक्षित आहे. अशात भारताचे कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे फिरकीपटू मोठा प्रभाव पाडू शकतील. इंग्लंडसाठी लेग-स्पिनर आदिल रशीद चांगली कामगिरी करत आहेत. मात्र, त्याला मोईन अलीची फारशी साथ लाभलेली नाही.

हेही वाचा >>> T20 World Cup 2024 : दक्षिण आफ्रिकेला अफगाणिस्तान रोखणार?उपांत्य फेरीच्या लढतीत आज आमनेसामने

भारतीय संघाने २००७ मध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर मात्र भारताला जेतेपदापर्यंत पोहोचता आलेले नाही. भारताने २०१४ मध्ये अंतिम फेरी, तर २०१६ आणि २०२२ मध्ये उपांत्य फेरी गाठली होती. यंदा रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. भारतीय संघ यंदाच्या स्पर्धेत अपराजित असून गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या विभागांत खेळाडूंनी चमक दाखवली आहे. फलंदाजांनीही गेल्या काही सामन्यांत कामगिरी उंचावल्याचे पाहायला मिळाले आहे.

दुसरीकडे, इंग्लंडचा संघ जेतेपद आपल्याकडेच राखण्यास उत्सुक आहे. यंदाच्या स्पर्धेत इंग्लंड संघाला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. साखळी फेरीत चारपैकी केवळ दोन सामने जिंकूनही इंग्लंडने ‘अव्वल आठ’ फेरी गाठली. या फेरीत पहिल्या सामन्यात इंग्लंडने वेस्ट इंडिजला नमवले. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला. मात्र, अखेरच्या लढतीत अमेरिकेचा धुव्वा उडवल्याने इंग्लंडला उपांत्य फेरीत स्थान मिळाले. परंतु भारताचा विजयरथ रोखायचा झाल्यास इंग्लंडला सर्वच विभागांतील कामगिरी उंचवावी लागणार आहे.

बुमरा, कुलदीपवर मदार

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताच्या गोलंदाजीची भिस्त जसप्रीत बुमरा आणि चायनामन फिरकीपटूू कुलदीप यादव यांच्यावर असेल. बुमराने यंदाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात सहा सामन्यांत ११ गडी बाद केले असून षटकामागे केवळ ४.०८ च्या धावगतीने धावा दिल्या आहेत. त्यामुळे इंग्लंडचे सलामीवीर जोस बटलर आणि फिल सॉल्ट विरुद्ध बुमरा हे द्वंद्व पाहण्यासारखे असेल. कुलदीपला अमेरिकेत झालेल्या साखळी सामन्यांत संधी मिळाली नव्हती. मात्र, विंडीजमध्ये फिरकीला अनुकूल खेळपट्ट्या मिळताच भारताने कुलदीपला खेळवण्याचा निर्णय घेतला. त्याने तीन सामन्यांतच सात बळी मिळवले असून इंग्लंडविरुद्धही त्याची भूमिका महत्त्वाची असेल. तसेच अर्शदीप सिंगही (६ सामन्यांत १५ बळी) प्रभावी मारा करत आहे.

कोहलीला सूर गवसणार?

भारतीय संघाने ट्वेन्टी-२० विश्वचषकात दमदार कामगिरी केली असली, तरी तारांकित फलंदाज विराट कोहलीला त्यात फारसे योगदान देता आलेले नाही. कोहलीला धावांसाठी झगडावे लागले आहे. तो सहा सामन्यांत केवळ ६६ धावाच करू शकला आहे. मात्र, कोहलीसारख्या फलंदाजाला कमी लेखण्याची चूक इंग्लंड करणार नाही. त्याला आता सूर गवसतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. कर्णधार रोहित शर्माने गेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपली अलौकिक गुणवत्ता पुन्हा सिद्ध करताना ४१ चेंडूंत ९२ धावांची फटकेबाज खेळी केली होती. त्याने लय राखणे गरजेचे आहे. मधल्या फळीत ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे यांचे योगदान निर्णायक ठरू शकेल.

बटलर, सॉल्ट, रशीदवर इंग्लंडची भिस्त

इंग्लंड संघाची फलंदाजीत कर्णधार जोस बटलर आणि फिल सॉल्ट हे सलामीवीर, तर गोलंदाजीत लेग-स्पिनर आदिल रशीदवर भिस्त असेल. बटलरने गेल्या सामन्यात अमेरिकेविरुद्ध ३८ चेंडूंत नाबाद ८३ धावांची झंझावाती खेळी केली होती. तसेच सॉल्टही लयीत असून त्याने सात सामन्यांत १६६.३६च्या स्ट्राइक रेटने १८३ धावा फटकावल्या आहेत. या दोघांपासून भारताला सावध राहावे लागेल. इंग्लंडच्या मधल्या फळीतील जॉनी बेअरस्टो आणि मोईन अली या अनुभवी फलंदाजांना फारशी चमक दाखवता आलेली नाही. हॅरी ब्रूकने काही उपयुक्त खेळी केल्या आहेत. गोलंदाजीत रशीदच्या नावे सात सामन्यांत नऊ बळी आहेत. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरही आता पूर्णपणे तंदुरुस्त असून त्याला लयही सापडली आहे. ख्रिास जॉर्डनने गेल्या सामन्यात अमेरिकेविरुद्ध हॅट्ट्रिक नोंदवली होती. त्यामुळे त्याचाही आत्मविश्वास उंचावला असेल.

उपांत्य सामन्यावर पावसाचे सावट

भारत आणि इंग्लंड यांच्यात गयाना येथे होणाऱ्या उपांत्य सामन्यावर पावसाचे सावट आहे. गयाना येथे गेल्या काही दिवसांपासून पाऊस असून गुरुवारी, सामन्याच्या दिवशी ६० टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उपांत्य फेरीचे सामने पूर्ण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) २५० मिनिटांचा (चार तास १० मिनिटे) अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे. मात्र, पावसामुळे सामना न होऊ शकल्यास ‘अव्वल आठ’ फेरीत सरस कामगिरी करणारा भारतीय संघ थेट अंतिम फेरी गाठेल. भारताने ‘अव्वल आठ’ फेरीत गट-१ मध्ये अग्रस्थान मिळवत उपांत्य फेरी गाठली, तर इंग्लंडचा संघ गट-२ मध्ये दुसऱ्या स्थानी राहिला होता.