भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी समान्याला आजपासून (१५ फेब्रुवारी) सुरुवात झाली आहे. हा सामना राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोशिएशन स्टेडियमवर होत असून भारताने नाणेफेक जिंकून सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाचे मधल्या फळीतील प्रमुख फलंदाजांना दुखापतीचा सामना करावा लागतोय. या फलंदाजांच्या माघारीमुळे भारतीय संघाला नवोदित फलंदाजांवर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे आज भारतीय संघ कशी कामगिरी करणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
बेन स्टोक्स खेळतोय १०० वी कसोटी
आजच्या सामन्याच्या रुपात सर्फराझ खान आणि ध्रुव जुरेल या खेळाडूंनी पदार्पण केले आहे. त्यामुळे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी हा सामना त्यांच्यासाठी फार मोठी संधी असणार आहे. तर इंग्लंडच्या संघाबद्दल बोलायचे झाल्यास कर्णधार बेन स्टोक्सचा हा १००वा कसोटी सामना आहे. या खास सामन्यात तो काय कामगिरी करणार, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. १०० वी कसोटी खेळणारा स्टोक हा इंग्लंडचा १६वा तर ७६वा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरला आहे.
आर. अश्विन, जेम्स अँडरसन विक्रम रचणार का?
रवीचंद्रन अश्विन त्याच्या ५००व्या विकेट्सपासून एक विकेट दूर आहे. या सामन्यात तो हा टप्पा पार करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तर इंग्लंडच्या संघात जेम्स अँडरसन त्याच्या ७००व्या विकेटपासून ५ विकेट्सने दूर आहे. तोही या सामन्यात पाच गडी बाद करणार का? हे पाहणे रंजक ठरणार आहे.
भारताचे दोन गडी बाद
सध्या पहिल्या डावात भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल मैदानात उतरले होते. मात्र यशस्वी जैस्वाल अवघ्या १० धावा करून जेलबाद झाला. तर शुभमन गिलसुद्धा आश्चर्यकारकरित्या शून्यावर झेलबाद झाला.