कॅन्टरबरी : आत्मविश्वास दुणावलेल्या भारतीय महिला संघाचे लक्ष्य इंग्लंडविरुद्ध बुधवारी होणारा दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना जिंकत मालिकेत विजयी आघाडी मिळवण्याचे असणार आहे.
ट्वेन्टी-२० मालिकेत भारताने इंग्लंडकडून १-२ अशी हार पत्करली. या पराभवानंतर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या भारतीय संघाने आपला खेळ उंचावत पहिला एकदिवसीय सामना सात गडी राखून जिंकला.
भारताची उपकर्णधार स्मृती मानधनाने पहिल्या सामन्यात नाबाद ९१ धावांची निर्णायक खेळी केली होती, तर यास्तिका भाटियाने अर्धशतक झळकावले होते. यानंतर हरमनप्रीतने नाबाद ७४ धावा करत संघाचा विजय निश्चित केला. या सामन्यात सलामीवीर शफाली वर्माकडून संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
दुसरीकडे, इंग्लंडला आपल्या फलंदाजांकडून अधिकाधिक योगदान अपेक्षित आहे. त्यांची मदार सोफी डंकले आणि एलिसे कॅप्सेवर असेल.
’ वेळ : सायं. ५.३० वा.
’ थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स