वृत्तसंस्था, न्यूयॉर्क
‘आयसीसी’ जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचे ध्येय बाळगून अमेरिकेत दाखल झालेला भारतीय संघ ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आपल्या मोहिमेस आज, बुधवारी आयर्लंडविरुद्ध प्रारंभ करेल. आयर्लंडच्या संघाने यापूर्वी विविध क्रिकेट विश्वचषकांमध्ये धक्कादायक निकाल नोंदवण्याची क्षमता सिद्ध केली आहे. त्यामुळे भारतीय संघाला विजयी सलामी देणे तितकेसे सोपे जाणार नाही.
भारतीय संघाची २०१३ नंतर ‘आयसीसी’ची जागतिक स्पर्धा जिंकण्याची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. गतवर्षी मायदेशात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात एकही लढत न गमावता अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या भारतीय संघाला अखेर उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. आता कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या तारांकित खेळाडूंसाठी ट्वेन्टी-२० विश्वचषक उंचावण्याची ही अखेरची संधी असू शकेल. त्यामुळे अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होत असलेल्या या स्पर्धेत आपली सर्वोत्तम कामगिरी करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.
हेही वाचा >>>T20 World Cup 2024 : आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मासह कोण सलामी देणार? प्रशिक्षक राहुल द्रविडने दिले उत्तर
सध्या ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये विश्वातील बहुतांश संघ युवा खेळाडूंना प्राधान्य देत असताना भारतीय संघाने मात्र अनुभवी खेळाडूंवरच विश्वास दाखवला. विशेषत: विराट कोहलीवर अनेक वर्षांपासून ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील त्याच्या स्ट्राईक रेटवरून टीका होत आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या ‘आयपीएल’मध्ये त्याने अधिक आक्रमक फलंदाजी करण्याची तयारी दर्शवली. त्याने ‘आयपीएल’ कारकीर्दीतील सर्वोत्तम १५४.७०च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. आता तो आपली आक्रमक शैली ट्वेन्टी-२० विश्वचषकातही कायम राखतो का, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल.
न्यूयॉर्कच्या नसाऊ कौंटी ग्राऊंडवर हा सामना खेळवला जाणार असून येथील खेळपट्टी संथ असणे अपेक्षित आहे. अशात रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादवसारख्या फिरकीपटूंची भूमिका भारतासाठी निर्णायक ठरू शकेल. त्याच वेळी भारताला डावखुरा फिरकीपटू जॉर्ज डॉकरेल आणि लेग-स्पिनर गॅरेथ डिलेनी यांसारख्या आयर्लंडच्या फिरकीपटूंपासून सावध राहावे लागेल. मात्र, सराव सामन्यात बांगलादेशविरुद्ध मिळवलेल्या मोठ्या विजयामुळे भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावला असून आयर्लंडविरुद्धच्या सामन्यातही त्यांचेच पारडे जड मानले जात आहे.
स्टर्लिंग, लिटलवर मदार
आयर्लंड संघाच्या फलंदाजीची मदार कर्णधार पॉल स्टर्लिंग, हॅरी टेक्टर, अँडी बालबिर्नी यांच्यावर, तर गोलंदाजीची मदार वेगवान गोलंदाज जोश लिटल, डावखुरा फिरकीपटू जॉर्ज डॉकरेल यांच्यावर असेल. स्टर्लिंगच्या गाठीशी १४२ आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामन्यांचा अनुभव आहे. फलंदाज म्हणून आयर्लंडला आक्रमक सुरुवात करून देण्याची आणि ऑफ-स्पिनर म्हणून महत्त्वपूर्ण बळी मिळवण्याची स्टर्लिंगमध्ये क्षमता आहे. त्याच्यापासून भारतीय संघाला सावध राहावे लागेल. डावखुरा वेगवान गोलंदाज जोश लिटलला ‘आयपीएल’मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळण्याचा अनुभव आहे. याचाही आयर्लंडला फायदा होऊ शकेल.
फलंदाजी क्रमाबाबत उत्सुकता
भारताच्या फलंदाजी क्रमाबाबत बरीच उत्सुकता आहे. भारताच्या डावाची रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी सुरुवात करावी असा सध्या मतप्रवाह आहे. भारताकडे यशस्वी जैस्वालसारखा उत्तम पर्याय उपलब्ध आहे. मात्र, सराव सामन्यात कोहली अनुपलब्ध असताना जैस्वालला फलंदाजीची संधीही मिळाली नाही. त्यामुळे आता रोहित आणि कोहलीच सलामीला येणार असे संकेत मिळत आहेत. यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून ऋषभ पंतला पसंती मिळणे अपेक्षित आहे. मधल्या फळीची भिस्त पंत, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे यांच्यावर असेल. अष्टपैलू म्हणून हार्दिक, दुबे आणि रवींद्र जडेजा यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरेल. तसेच भारतीय संघ या सामन्यात दोन की तीन वेगवान गोलंदाजांसह खेळणार हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे. गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमरा आणि कुलदीप यादव या दोघांचेच भारतीय संघातील स्थान निश्चित आहे
● वेळ : रात्री ८ वा.
● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी, हॉटस्टार अॅप