पहिल्या दिवसअखेर भारत ४ बाद २५८, शुभमन, जडेजा यांचीही दमदार अर्धशतके
कानपूर : मुंबईकर श्रेयस अय्यरने धैर्य, आक्रमकता आणि कौशल्याचे दर्शन घडवत कसोटी पदार्पण झोकात साजरे केले. श्रेयसच्या नाबाद ७५ धावांच्या शानदार खेळीच्या बळावर भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी पहिल्या डावात ४ बाद २५८ अशी समाधानकारक धावसंख्या उभारली.
अनियमित उसळी आणि वेग यांना साथ न देणाऱ्या कानपूरच्या खेळपट्टीवर कसोटी क्रिकेटचा पहिलाच दिवस गाजवताना श्रेयसने १३६ चेंडूंचा सामना करीत सात चौकार आणि दोन षटकारांसह आपली खेळी साकारली.
भारताची ३ बाद १०६ धावसंख्या झाली असताना चेतेश्वर पुजारा (८८ चेंडूंत २६ धावा) बाद झाला आणि पदार्पणवीर श्रेयस मैदानावर उतरला. मग अर्ध्या तासाने समोरच्या बाजूने सावधपणे खेळणारा कर्णधार अजिंक्य रहाणेला (६५ चेंडूंत ३३ धावा) कायले जेमिसनने (१५.२-६-४७-३) तंबूची वाट दाखवली. जेमिसन आणि टिम साऊदी (१६.४-३-४३-१) या जोडीने उपाहारानंतरच्या दुसऱ्या सम्त्रात भारताला हादरे दिले.
४ बाद १४५ अशा स्थितीत रहाणे बाद झाल्यानंतर श्रेयसने भारताच्या डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. रहाणेने अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या (१०० चेंडूंत ५०* धावा) साथीने पाचव्या गडय़ासाठी ११३ धावांची अविरत भागीदारी रचताना धावफलक हलता ठेवला. जडेजाने कारकीर्दीतील १७वे अर्धशतक नोंदवताना सहा चौकार मारले.
स्थानिक क्रिकेटमधील ५४ सामन्यांत ५२.१८च्या धावसरासरीने ४५९२ धावा करणाऱ्या श्रेयसने पूल, स्कूप, ड्राइव्ह, कट अशा फटक्यांची नजाकत आत्मविश्वासाने पेश केली. याचप्रमाणे जेमिसन आणि साऊदी यांच्या गोलंदाजीचा सामना करताना मुंबईकर ‘खडूस’पणाही दाखवला. या खेळीतील षटकार हे ट्वेन्टी-२० क्रिकेटला साजेसे होते.
त्याआधी, सकाळच्या सत्रात रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, मग सात फुटांच्या जेमिसनने मयांक अगरवालला (१३) बाद करीत भारताची सलामीची भागीदारी फोडली. मग शुभमन गिलने (९३ चेंडूंत ५२ धावा) पुजाराच्या साथीने दुसऱ्या गडय़ासाठी ६१ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला, दुसऱ्या सत्रात जेमिसनने गिलचा त्रिफळा उडवला, तर साऊदीने पुजाराला (२६) बाद केले. मग रहाणे आणि श्रेयस यांनी तिसऱ्या गडय़ासाठी ३९ धावांची भागीदारी करताना धावफलकाला स्थैर्य दिले.
संक्षिप्त धावफलक
भारत (पहिला डाव) : ८४ षटकांत ४ बाद २५८ (श्रेयस अय्यर खेळत आहे ७५, शुभमन गिल ५२, रवींद्र जडेजा खेळत आहे ५०; कायले जेमिसन ३/४७)
गावस्कर यांच्या हस्ते टोपी
माजी फलंदाज सुनील गावस्कर यांनी सामन्याआधी भारतीय संघाची टोपी श्रेयसला बहाल करताना खास खेळाडू अशा शब्दांत त्याला गौरवले. गावस्कर आणि श्रेयस हे दोघेही मुंबईकर खेळाडू असल्याचा योगही यावेळी साधला गेला. राहुल द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून माजी क्रिकेटपटूच्या हस्ते टोपी देण्याची पद्धत सुरू केली आहे. श्रेयस हा कसोटी पदार्पण करणारा भारताचा ३०२वा खेळाडू ठरला आहे.
पुनरावृत्तीची संधी
१९६९मध्ये कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर बिल लॉरीच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध गुंडप्पा विश्वनाथने (१३७) पदार्पणात शतक साकारले होते. पहिल्या डावात भोपळाही फोडू न शकलेल्या विश्वनाथने दुसऱ्या डावात शतक नोंदवले होते. ५२ वर्षांनंतर श्रेयसला त्या पराक्रमाची पुनरावृत्ती करण्याची संधी चालून आली आहे.