न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील मानहानीकारक पराभवामुळे खचलेला भारतीय संघ कसोटी मालिकेत नशीब पालटेल का, या आशेने सामोरे जात आहे. पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने अनपेक्षितपणे ०-४ अशा फरकाने गमावली. याचप्रमाणे आयसीसी क्रमवारीतील अग्रस्थानसुद्धा खालसा झाले. या पाश्र्वभूमीवर गुरुवारपासून सुरू होणारी दोन कसोटी सामन्यांची मालिका भारतासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
कसोटी मालिकेला सामोरे जाण्यापूर्वी भारतीय संघ खेळलेला एक सराव सामना अनिर्णीत राहिला. खेळाडूंच्या वैयक्तिक कामगिरीचा विचार करता या सामन्याचा निकाल संमिश्र असाच राहिला. सध्या कसोटी मालिकेत भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर आहे. भारताचे हे स्थानसुद्धा डावावर लागले आहे. भारताला दुसरे स्थान टिकवण्यासाठी ही मालिका किमान बरोबरीत सोडवणे अनिवार्य आहे.
प्रग्यान ओझाला वगळल्यास (त्याच्याऐवजी ईश्वर पांडे संघात) हा तोच भारतीय संघ आहे, जो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत ०-१ अशा फरकाने हरला होता. भारतीय क्रिकेटमधून सचिन तेंडुलकरच्या अस्तानंतर आता नवे पान उलटले गेले आहे. भारताच्या युवा फलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये आपले स्थान बळकट करायला सुरुवात केली आहे.
अनुभवी झहीर खानच्या नेतृत्वाखाली भारताचा गोलंदाजीचा मारासुद्धा समर्थपणे कामगिरी करीत आहे. जोहान्सबर्गमधील पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पराभवाच्या खाईतून सामना अनिर्णीत राखण्याची किमया साधली. विजय आणि पुजारा वगळल्यास भारताची फलंदाजीची फळी दोन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये बहुतांशी सारखी आहे. न्यूझीलंडच्या भूमीवर विराट कोहली आणि कप्तान महेंद्रसिंग धोनी सातत्याने खेळताना दिसले. रोहितला चांगली सुरुवात करून देण्यात वारंवार अपयश आले, तर अजिंक्य रहाणे धावांसाठी झगडताना आढळला. शिखर धवनचाही धावांचा प्रवाह परदेशात आटला.
दक्षिण आफ्रिकेत डेल स्टेन, मॉर्नी मॉर्केल आणि व्हर्नन फिलँडर या वेगवान त्रिकुटाने भारतीय फलंदाजांवर वेसण घातली. हेच सूत्र आजमावण्याचे न्यूझीलंडने ठरवले आहे. याचप्रमाणे या कसोटीच्या सर्व दिवशी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी स्वीकारू शकेल. किवी संघनायक ब्रेन्डन मॅक्क्युलमने भारतात जन्मलेला इश सोधी अंतिम संघात असेल, असे संकेत दिले आहेत.

वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळविणाऱ्या संघात आम्ही बदल करणार नसून चार वेगवान गोलंदाज खेळविण्याची शक्यता आहे. येथील खेळपट्टीवर गवत असल्यामुळे त्याचा फायदा घेण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमचा फिरकी गोलंदाज इश सोधीने या मोसमात चांगले यश मिळविले आहे. भारताविरुद्धही तो प्रभावी कामगिरी करील अशी मला खात्री आहे. गतवर्षी मार्चमध्ये येथील गवताचा फायदा घेत आमच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांवर प्रभुत्व गाजविले होते. भारताकडेही चांगले गोलंदाज असले तरी त्यांच्या तुलनेत आम्हाला येथील स्थितीचा फायदा मिळणार आहे.  ब्रेन्डन मॅक्क्युलम
संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार/यष्टीरक्षक), शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, वृद्धिमान साहा, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, झहीर खान, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि उमेश पांडे.
न्यूझीलंड : ब्रेन्डन मॅक्क्युलम (कर्णधार), कोरे अँडरसन, ट्रेंट बोल्ट, डग ब्रेसवेल, पीटर फुल्टन, हमिश रुदरफोर्ड, जेसी रायडर, इश सोधी, टिम साऊदी, रॉस टेलर, नील व्ॉगनर, बीजे वॉटलिंग (यष्टीरक्षक), केन विल्यम्सन.
सामन्याची वेळ : पहाटे ३.३० वाजल्यापासून.
थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स.

व्हेटोरीला पुनरागमनाची आशा
ऑकलंड : न्यूझीलंडचा अनुभवी फिरकी गोलंदाज डॅनियल व्हेटोरी सध्या दुखापतीशी सामना करीत आहे. परंतु तो दुखापतीतून बरा झाल्यावर त्याचे न्यूझीलंड संघात सहजपणे पुनरागमन होऊ शकते, असे संकेत कर्णधार ब्रेन्डन मॅक्क्युलमने दिले आहेत. जागतिक क्रिकेटमधील एक सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटू अशी ख्याती असलेला व्हेटोरी दुखापतीमुळे गेले १८ महिने कसोटी क्रिकेटपासून दूर आहे.

महत्त्वाच्या क्षणी आम्ही चुका करीत एकदिवसीय सामने गमावले होते. तशा चुका टाळाव्यात अशी मी सूचना माझ्या सहकाऱ्यांना केली आहे. न्यूझीलंडमधील अनुकूल स्थितीचा फायदा घेत सर्वोत्तम कामगिरी करीत कसोटी मालिका जिंकण्याचा प्रयत्न करण्यासाठीच आम्ही खेळणार आहोत. एकदिवसीय सामन्यांमध्ये आमच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती, मात्र ऐन मोक्याच्या क्षणी आम्ही खराब खेळ करीत पराभव स्वीकारला. तशा चुका पुन्हा होणार नाहीत याची खबरदारी आम्ही घेऊ. -महेंद्रसिंग धोनी

Story img Loader