दुबई : भारत आणि न्यूझीलंड हे तुल्यबळ संघ आज, रविवारी चॅम्पियन्स करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांचे उपांत्य फेरीतील स्थान आधीच निश्चित असले, तरी ‘अ’ गटात अग्रस्थान कोण पटकावणार, याचा निर्णय या सामन्याच्या निकालावर अवलंबून आहे. त्यामुळे दोन्ही संघ सर्वोत्तम कामगिरीचा प्रयत्न करतील. तसेच उपांत्य फेरीपूर्वी दोन्ही संघांना प्रयोगाचीही ही एक संधी असल्याने काही राखीव खेळाडूंना खेळविण्याबाबतही ते विचार करू शकतील.
भारतीय संघाला उपांत्य फेरीत आपला प्रतिस्पर्धी कोण असणार हे अद्याप ठाऊक नसले, तरी हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरच होणार याची त्यांना कल्पना आहे. भारताला आपले सर्व सामने एकाच मैदानावर खेळण्याचा ‘गैर’फायदा मिळत असल्याची टीका अन्य देशांतील काही आजी-माजी खेळाडूंनी केली आहे. या मैदानावर खेळताना पहिल्या दोन साखळी सामन्यांत भारताने अनुक्रमे बांगलादेश आणि पाकिस्तान या आशियाई संघांवर सहज मात केली. मात्र, न्यूझीलंडला नमवायचे झाल्यास भारतीय संघाला आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यावाचून पर्याय नाही. विशेषत: दुबईच्या मैदानाची खेळपट्टी संथ असल्याने फिरकीपटूंविरुद्धचा खेळ भारतीय फलंदाजांना उंचवावा लागणार आहे.
पहिल्या दोन साखळी सामन्यांत बांगलादेशचे मेहिदी हसन आणि रिशाद हुसेन यांनी, तसेच पाकिस्तानचा लेग-स्पिनर अबरार अहमदने भारतीय फलंदाजांसमोर बरेच प्रश्न उपस्थित केले. भारतीय फलंदाजांनी आक्रमकता दाखविण्याऐवजी फिरकीपटूंची षटके खेळून काढण्यास प्राधान्य दिले होते. न्यूझीलंडविरुद्ध अशा शैलीत खेळणे भारताला महागात पडू शकेल. गेल्या वर्षाच्या अखेरीस मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजांना न्यूझीलंडचा डावखुरा फिरकीपटू मिचेल सँटनरने अडचणीत टाकले होते. आता भारतीय फलंदाजांना आक्रमकता दाखवावी लागेल. सँटनरला मायकल ब्रेसवेल आणि ग्लेन फिलिप्स या ऑफ-स्पिन गोलंदाजांची साथ लाभेल. भारतीय फलंदाज या फिरकी त्रिकुटाविरुद्ध कसे खेळतात यावर या सामन्याचा निकाल अवलंबून असेल.
विल्यम्सन, सँटनरवर भिस्त
न्यूझीलंड संघही लयीत असून साखळी फेरीत त्यांनी अनुक्रमे यजमान पाकिस्तान आणि बांगलादेशला पराभूत केले. न्यूझीलंडच्या फलंदाजीची भिस्त प्रामुख्याने केन विल्यम्सन आणि रचिन रवींद्र यांच्यावर असेल. विल्यम्सनला दोन सामन्यांत अनुक्रमे १ आणि ५ धावाच करता आल्या आहेत. मात्र, भारताविरुद्ध त्याने यापूर्वी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याच्यावर अंकुश ठेवणे भारतासाठी महत्त्वाचे ठरेल. न्यूझीलंडच्या गोलंदाजीची मदार कर्णधार मिचेल सँटनर आणि मायकल ब्रेसवेल या फिरकी गोलंदाजांवर असेल.
हार्दिकला बढती; फिरकीतही बदल?
● दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंची भूमिका निर्णायक ठरणार हे निश्चित आहे. भारतीय संघ पहिल्या दोन साखळी सामन्यांत रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुपदीप यादव या फिरकी गोलंदाजांसह खेळला. मात्र, न्यूझीलंडविरुद्ध या तिघांपैकी दोघांना विश्रांती देऊन वरुण चक्रवर्ती आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संधी देण्याबाबत भारतीय संघ विचार करू शकेल.
● शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी एकेक शतक करताना आपली लय दाखवून दिली आहे. कर्णधार रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्याला फलंदाजीची फारशी संधी मिळालेली नाही. न्यूझीलंडविरुद्ध त्याला बढती दिली जाऊ शकेल. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला खेळविण्याचाही भारतीय संघ व्यवस्थापन विचार करत आहे.