लोकसत्ता : पुणे : न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिल्या सामन्यातील पराभवाने पिछाडीवर असलेला यजमान भारतीय संघ आजपासून पुणे येथे सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून आव्हान राखण्याचा प्रयत्न करेल. त्याच वेळी पाहुणा न्यूझीलंड संघ मात्र अशक्यही शक्य करण्याच्या प्रयत्नात असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मायदेशात खेळताना भारतीय संघ कधीही मालिकेत पिछाडीवर राहिलेला नाही. एकदा २०१७ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्ध असे घडले. मात्र, दोन्ही वेळा भारताने मालिकेत मुसंडी मारून मालिका जिंकण्याची कामगिरी करून दाखवली आहे. अशीच काहीशी कामगिरी या वेळीदेखील भारताच्या नव्या संघाकडून चाहत्यांना अपेक्षित आहे. न्यूझीलंडविरुद्ध भारत किमान मायदेशात कधी पिछाडीवर राहिले नव्हते. आता दोन कसोटी सामने बाकी असताना पुण्यात महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर भारतीय संघ पुनरागमन करण्याची अपेक्षा बाळगून आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर यांचेदेखील असेच नियोजन आहे.

हेही वाचा >>> सीमेवरील शांततेला प्राधान्य असावे’; जिनपिंग यांना पंतप्रधान मोदी यांचे आवाहन

फलंदाजीचे अनेक पर्याय, सर्वोत्तम गोलंदाजी आणि सळसळता तरुण उत्साह यामुळे अलीकडच्या काळात भारताला क्रिकेटमध्ये क्वचितच आव्हान मिळाले आहे. रविचंद्रन अश्विन, रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यात असताना भारतीय संघ काहीसा संक्रमण अवस्थेतून जात असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

हे सत्य असले, तरी भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्याप्रमाणे पुण्यातही विजयासाठी पहिली पसंती मिळत आहे. हवामानामुळे निर्माण झालेल्या वेगळ्या परिस्थितीत नाणेफेकीनंतरचा चुकलेला निर्णय भारताच्या पराभवास कारणीभूत ठरला होता. तरी, दुसऱ्या डावात हातात वेळ कमी असतानाही भारतीय खेळाडूंनी सामना निर्णायक राखण्याच्या दृष्टीने उचित प्रयत्न केले हे नाकारता येत नाही. प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आज पुन्हा एकदा भारताच्या या प्रयत्नांचे कौतुक केले.

खेळपट्टीने फिरकीला साथ दिल्यास न्यूझीलंडला केन विल्यम्सनची उणीव जाणवेल. कर्णधार टॉम लॅथम, डेव्हॉन कॉन्वे, रचिन रवींद्र, विल यंग यांना फलंदाजीत डॅरेल मिचेल आणि टॉम ब्लंडेलकडून साथ मिळणे अपेक्षित आहे. त्याच वेळी पुन्हा एकदा मॅट हेन्री, टिम साऊदी, विल्यम ओरूरके आणि फिरकी गोलंदाज एजाझ पटेल यांना भारतीय फलंदाजांना गुंडाळण्याची ताकद दाखवून द्यावी लागेल.

● वेळ : सकाळी ९.३० वा.

● थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-१, जिओ सिनेमा.

अंतिम संघ निवडण्याचे आव्हान

मालिकेत आव्हान राखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन भारतीय संघ देत असला तरी संघ व्यवस्थापनासमोर अंतिम अकरा जणांचा संघ निवडण्याचे आव्हान आहे यात शंका नाही. शुभमन गिल मानेच्या दुखापतीतून बरा झाला आहे. वॉशिंग्टन सुंदरलाही संघात स्थान मिळाले आहे. खेळपट्टीचे स्वरूप बघून संघ निवड होणार असली, तरी कुणाला वगळायचे हा यक्ष प्रश्न आहे. गिलला संघात स्थान मिळाल्यास सर्फराज खान आणि केएल राहुल यांच्यापैकी एकाला वगळले जाईल. पण, राहुलला वगळण्यास संघ व्यवस्थापन तयारी नाही. तीन फिरकीपटूंसह खेळण्याचा निर्णय घेतल्यास कुलदीप किंवा वॉशिंग्टन यांच्यापैकी एकाची निवड करावी लागेल. अशा वेळी बुमराला सिराज किंवा आकाश दीप यापैकी एकाचीच साथ मिळेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs new zealand second test cricket match from today zws