रोहित शर्माच्या अनुपस्थितीत संघात स्थान मिळालेल्या पृथ्वी शॉला वेलिंग्टन कसोटी सामन्यात आपली छाप पाडता आली नाही. पहिला कसोटी सामना भारतीय संघाने गमावला. यानंतर सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्यांनी दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी शुभमन गिलला संधी देण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र भारतीय कर्णधार विराट कोहलीने पृथ्वी शॉची पाठराखण करत दुसऱ्या कसोटी सामन्यातही त्याला संधी दिली.
मुंबईकर पृथ्वी शॉनेही आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करत अर्धशतक झळकावलं. पृथ्वीने ६४ चेंडूत ८ चौकार आणि एका षटकारासह ५४ धावा केल्या. मात्र उपहाराच्या सत्राआधीच पृथ्वी शॉ जेमिसनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. स्लिपमध्ये उभ्या असलेल्या लॅथमने हवेत उडी मारत एका हातात झेल घेत पृथ्वी शॉला माघारी धाडलं.
How about this grab from Latham! pic.twitter.com/3XGwk0vuU8
— Canterbury Cricket (@CanterburyCrick) February 29, 2020
सलामीवीर मयांक अग्रवाल स्वस्तात माघारी परतल्यानंतर पृथ्वीने दुसऱ्या विकेटसाठी चेतेश्वर पुजारासोबत अर्धशतकी भागीदारी केली. उपहाराच्या सत्रानंतर भारतीय संघाची पडझड झाली…मात्र त्यानंतर चेतेश्वर पुजाराने हनुमा विहारीसोबत भागीदारी रचत भारताची झुंज कायम ठेवली.
अवश्य वाचा – Ind vs NZ : पृथ्वी शॉला सूर गवसला; अर्धशतकी खेळीसह सचिनच्या पंगतीत मिळवलं स्थान