टी २० वर्ल्डकपनंतर न्यूझीलंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियाने कंबर कसली आहे. भारतीय संघात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. टी २० संघाची धुरा आता रोहित शर्माकडे असणार आहे. तर पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहली नसल्याने कर्णधारपद कुणाकडे द्यायचं?, याची खलबतं सुरु आहेत. दरम्यान कसोटी मालिकेसाठी रोहित शर्माने बीसीसीआयकडे आराम मागितल्याचं वृत्त आहे. त्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्माऐवजी कर्णधारपद अजिंक्य रहाणे मिळेल, असं सांगण्यात येत आहे.

टी २० वर्ल्डकपमधील रोहित शर्माचा फॉर्म आणि इंग्लंड दौऱ्यात केलेली कामगिरी पाहता बीसीसीआय त्याचा नावाचा विचार करत होती. मात्र आता रोहित शर्माने कसोटीसाठी आराम देण्याची मागणी केलीय आहे, असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. त्यामुळे आता कानपूर कसोटी सामन्याची धुरा अजिंक्य रहाणेकडे दिली जाण्याची शक्यता आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत उपकर्णधार अजिंक्य रहाणने संघाचं कर्णधारपद भूषवलं आहे. अजिंक्य रहाणेने आतापर्यंत पाच कसोटी सामन्यांचं नेतृत्व केलं आहे. यापैकी चार सामन्यात विजय मिळवला आहे. तर एक सामना अनिर्णित ठरला आहे. या वर्षी रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात २-१ ने ऐतिहासिक विजय मिळवला होता.

न्यूझीलंड टी २० वर्ल्डकप संपल्यानंतर थेट भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात न्यूझीलंडसोबत तीन टी २० आणि दोन कसोटी सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. जयपूर, रांची आणि कोलकाता येथे टी २० सामने असतील. तर कसोटी सामने कानपूर आणि मुंबई होणार आहेत.

  • टी २० भारत विरुद्ध न्यूझीलंड- १७ नोव्हेंबर, संध्याकाळी ७.३० वाजता, जयपूर
  • टी २० भारत विरुद्ध न्यूझीलंड- १९ नोव्हेंबर, संध्याकाळी ७.३० वाजता, रांची
  • टी २० भारत विरुद्ध न्यूझीलंड- २१ नोव्हेंबर, संध्याकाळी ७.३० वाजता, कोलकाता
  • पहिला कसोटी सामना- २५ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर, कानपूर
  • दुसरा कसोटी सामना- ३ डिसेंबर ते ७ डिसेंबर, मुंबई

Story img Loader