भारत आणि पाकिस्तानदरम्यान आशिया चषक स्पर्धेमध्ये सुरु असणाऱ्या सामन्यामध्ये भारतीय क्रिकेट नियमन मंडळाचे अध्यक्ष जय शाह उपस्थित आहेत. सामन्यामधील घडामोडींबरोबरच या सामन्यासाठी उपस्थित राहिलेल्या व्यक्तींसंदर्भातही सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु असल्याचं चित्र सामना सुरु असताना दिसून येत आहे. यामध्ये जय शाह यांचाही समावेश आहे. असं असलं तरी भारताचे माजी क्रिकेटपटू आणि सध्या समालोचक असणाऱ्या संजय मांजरेकर यांनी जय शाहांबद्दल केलेल्या विधानामुळे ते ट्रोल होताना दिसत आहेत. (येथे क्लिक करुन पाहा लाइव्ह अपेडेट्स)
नक्की वाचा >> IND vs PAK T20 Asia Cup: …म्हणून ऋषभ पंत भारत-पाक सामन्यातून बाहेर; मैदानातील ‘या’ अभिनेत्रीला ठरवलं जातंय दोषी
दुबईमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर सुरु असणाऱ्या सामन्यादरम्यान जय शाह हे काही स्थानिक अधिकाऱ्यांसोबत सामना पाहत असल्याचं दृष्य एका क्षणाला स्क्रीनवर झळकलं. सामन्यातील चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूला जय शाह एका स्थानिक अधिकाऱ्याच्या बाजूला बसून सामना पाहत असल्याचं कॅमेराने टीपलं. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून स्क्रीनवर हे चित्र दिसताच संजय मांजरेकर यांनी केलेलं विधानही चर्चेत आहे.
संजय मांजरेकर यांनी जय शाह यांच्या सहकार्यामुळे या स्पर्धेचं आयोजन करणं शक्य झालं आहे अशा आशयाचं विधान केलं. तसेच, “ते हा सामना पाहत आहेत ही आपल्यासाठी सन्मानाची गोष्ट (प्रिव्हिलेज) आहे,” असंही मांजरेकर यांनी म्हटलं. याच दोन विधानांवरुन आता सोशल मीडियावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे.
अनेकांनी जय शाह यांच्या जन्माच्या आधीपासून आशिया चषक स्पर्धा भरवली जात असल्याची आठवण संजय मांजरेकरांना करुन दिली आहे. तर काहींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना जय शाह यांच्या या फोटोवरुन घराणेशाहीची आठवण करुन दिली आहे. काहींनी जेव्हा जेव्हा कॅमेरा जय शाह यांच्यावर जातो तेव्हा मांजरेकर त्यांचा उल्लेख जय शाहजी असा करत असल्याचंही ट्विटरवर म्हटलं आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील सामना हा या स्पर्धेतील दुसराच सामना आहे. भारत या मालिकेत ब गटात असून या गटात भारत, पाकिस्तानबरोबरच हाँगकाँगचा संघ आहे. दरम्यान, यापूर्वीही मांजरेकर यांनी समालोचन करताना रविंद्र जडेजाबद्दल केलेल्या विधानांवरुन मोठा वाद निर्माण झाला होता.