बर्मिंगहॅम मैदानात भारतीय फलंदाजांनी पाकिस्तान गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. पावसामुळे दोन षटके कमी केली असताना भारताने ३०० धावांचा टप्पा गाठला. या सामन्यात भारतीय फलंदाजीसमोर पाकिस्तानची गोलंदाजीतील धारच गायब झाल्याचे दिसले. पाकिस्तानच्या ताफ्यातील मध्यमगती गोलंदाज वहाब रियाज याची या सामन्यात चांगलीच धुलाई झाली. एकदिवसीय सामन्यातील ७५ हून अधिक सामन्यांचा अनुभव पाठिशी घेऊन मैदानात उतरलेल्या वाहब रियाजने ८.४ षटकात एकही बळी न मिळवता १०.०४ च्या सरासरीने तब्बल ८७ धावा दिल्या. पाकिस्तानसाठी तो सर्वात महागडा गोलंदाज ठरला. मैदानात धुलाई झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याची नेटिझन्सनी चांगलीच धुलाई सुरु केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

https://twitter.com/Mufti_Sahab/status/871362504890429440

सोशल मीडियावर काहीजणांनी त्याला ‘लगान’ चित्रपटातील आमिर खानच्या संघातील कचरापेक्षा खराब खेळी केल्याचे म्हटले आहे. वाहबपेक्षा कचरा भारी होता, अशा आशयाचे ट्विट एका नेटिझन्सने केले आहे. तर काही पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांनी त्याच्या निवडीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी पाकिस्तानी गोलंदाजी भारतपेक्षा भारी आहे, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात ऐकायला मिळाली. पाकिस्तानी वेगवान गोलंदाजातील धार मात्र सामन्यात अजिबात दिसली नाही. वाहबसोबतच वासिम आणि हसन अली हे देखील महागडे ठरले. त्यांनी सरासरी ७ पेक्षा अधिक धावा दिल्या. पाकिस्तानकडून केवळ मोहम्मद आमिरने चांगली गोलंदाजी केली. ८. १ षटकात त्याने ३.९२ च्या सरासरीने केवळ ३२ धावा दिल्या. त्याला अन्य कोणत्याही गोलंदाजाची साथ लाभली नाही. परिणामी भारताने पाकिस्तानसमोर धावांचा डोंगर उभारला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs pakistan champions trophy 2017 wahab riaz mohammad imir imad wasim hasan ali pakistan bowler