भारत पाकिस्तानमध्ये रंगलेल्या हाय व्होल्टेज सामन्यात भारताने एकतर्फी विजय मिळवत पाकिस्तानचा धुव्वा उडवला. या सामान्यात युवराज सिंगला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. युवीने ३२ चेंडूत ८ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ५३ धावा फटकावत सारं मैदान आपल्या खेळाने दणाणून सोडलं. युवराज सिंगला पाकिस्तान विरोधात खेळताना तिसऱ्यांदा सामनावीराचा पुरस्कार मिळाला आहे. मॅच संपल्यानंतर युवराजने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर करत आपला आनंद व्यक्त केला. कॅन्सरवर मात करत युवराजने क्रिकेटच्या मैदाना यशस्वी पुनरागमन केलं. तेव्हा ‘Cancer Survivor Day’ आणि मैदानातला पाकविरुद्धचा विजय असा योगायोग एकत्र जमून आला. म्हणूनच हा पुरस्कार कॅन्सरशी लढा देणाऱ्या प्रत्येक ‘हिरो’ ला समर्पित आहे, असं त्याने म्हटलं आहे.

आज चाहत्यांच्या प्रार्थना आणि त्यांचे आशीर्वाद पाठीशी होते म्हणूनच मी लढू शकलो. तेव्हा हा पुरस्कार त्यांच्यासाठीदेखील आहे असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याचप्रमाणे सामन्याच्या एक दिवस आधी झालेल्या लंडन दहशतवादी हल्ल्यातल्या मृत्युमुखी पडलेल्यांनाही त्याने श्रद्धांजली वाहिली. दमदार अर्धशतकाच्या जोरावर सलामीच्या लढतीत सामनावीराचा किताब पटकावून त्याने पुढील सामन्यांसाठी आपण सज्ज असल्याचे सिद्ध केले आहे. यापूर्वी १९ फेब्रुवारी २०१६ मध्ये कराची नॅशनल स्टेडिअमवर युवराजने पाकिस्तान विरोधात शतकी खेळी केली होती. यावेळी त्याने ९३ चेंडूत १४ चौकारांची चौफेर फटकेबाजी करत १०७ धावांची नाबाद खेळी केली होती. हा सामना भारताने ८ गडी राखून जिंकला होता. त्यानंतर ११ नोव्हेंबर २००७ साली कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर पाकिस्तान विरुद्ध रंगलेल्या सामन्यात युवीने अष्टपैलू कामगिरी केली होती. ९५ चेंडूत त्याने ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ७७ धावा ठोकल्या होत्या. या सामन्यात त्याने ५ षटकात १८ धावा देत १ गडी देखील बाद केला होता. युवराजच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर या सामन्यात भारताने पाकिस्तानला ४६ धावांनी पराभूत केले होते.

Story img Loader