Asia Cup 2022 IND vs PAK: आशिया चषक २०२२ मधील बहुप्रतीक्षित सामना, जागतिक क्रिकेटमधील दोन कट्टर प्रतिस्पर्धी – भारत आणि पाकिस्तान आज आमनेसामने येणार आहेत. आशिया चषकाचे वेळापत्रक जाहीर झाल्यापासून, चाहते या महासामन्याची वाट पाहत आहेत. योगायोग असा की भारत- पाक सामना हा त्याच स्टेडियममध्ये घडणार आहे जिथे १० महिन्यांपूर्वी २०२१ टी-२० विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात टीम पाकिस्तानकडून भारताला पराभव पत्करावा लागला होता. आता आशिया चषक सामन्याच्या आधी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने संघातील खेळाडूंना त्याच ऐतिहासिक सामन्याची आठवण करून दिली आहे. अंतिम सराव सत्रानंतर टीमशी आझम बोलत होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०२१ च्या टी-२० विश्वचषकात रंगलेला भारत – पाकिस्तान सामना हा आजही जगभरातील क्रिकेट प्रेमींच्या लक्षात आहे. भारतासारख्या बलाढ्य क्रिकेट टीमचा पराभव करून पाकिस्तानने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. विशेषतः शाहीन आफ्रिदीचा चेंडूसह उत्कृष्ट स्पेल आणि बाबर आणि सलामीचा जोडीदार मोहम्मद रिझवान यांच्यातील नाबाद शतकी भागीदारीमुळे भारतीय क्रिकेटपटूंची चिंता वाढवली होती. विश्वचषक स्पर्धेतील भारताविरुद्ध पाकिस्तानचा हा पहिलाच विजय होता.

आशिया चषक स्पर्धेतील भारत- पाकिस्तानच्या सामन्यापूर्वी सराव सत्र पार पडले यावेळी आपल्या खेळाडूंशी बोलताना कर्णधार बाबर आझमने, विश्वचषक सामन्याची आठवण करून देत आज आपण त्याच स्फूर्तीने खेळायचे आहे असे आवाहन केले. तसेच गुडघ्याच्या दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडलेल्या शाहीन आफ्रिदीची अनुपस्थिती त्यांना जाणवू नये यासाठी त्याने आपल्या वेगवान गोलंदाजांना सूचना केल्या. (Asia Cup 2022: IND vs PAK सामन्याआधी आफ्रिदी-विराटची भेट; कोहलीला म्हणाला,’आम्ही प्रार्थना करतो की तुला’..)

काय म्हणाला बाबर आझम

“आपण विश्वचषकात जसे खेळलो त्याच पद्धतीने आजचा सामना खेळायचा आहे. लक्षात जा, इतिहास आठवा आणि त्याची पुनरावृत्ती करा. ती तयारी आठवा, आजही आपण अशीच तयारी केली आहे. तुम्ही सराव सत्रात जी मेहनत केली ती खेळात दिसू दे. निकाल नक्की आपल्या बाजूने येईल, विश्वास ठेवा. मी आपल्या सगळ्या गोलंदाजांना हेच सांगेन की, शाहीन आफ्रिदी आजच्या सामन्यात आपल्यासोबत नसला तरी त्याची कमी जाणवू देऊ नका. ” (Asia Cup 2022: आशिया चषकामध्ये भारतीय फलंदाजांचा ‘हा’ विक्रम यंदाही राहणार कायम? आजवर एकदाही…)

आशिया चषक स्पर्धेत आजवर भारत पाकिस्तान मध्ये १३ सामने झाले होते यामध्ये भारताने ८ वेळा पाकिस्तानला धूळ चारली होती. आजही भारताचा पगडा भारी आहे. विश्वचषकातील जिव्हारी लागलेल्या पराभवाचा बदला टीम इंडिया घेणार का की बाबर आझमच्या नेतृत्वाखाली टीम पाकिस्तान पुन्हा एकदा आपल्या विजयाची पुनरावृत्ती करणार हे आता काहीच तासात समजेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs pakistan ind vs pak asia cup 2022 match t20 where to watch babar azam reminds team indias defeat in world cup 2021 svs