India vs Pakistan match on Disney Hotstar recorded a record 3.5 crore viewership: शनिवारी, १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये भारताने पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला. एकदिवसीय विश्वचषकातील विकेट्सच्या बाबतीत भारताचा पाकिस्तानविरुद्धचा हा सर्वात मोठा विजय आहे. भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध विक्रमी विजय मिळवला, तर एक विक्रमही प्रेक्षकांच्या नावावर झाला. हा विक्रम लाइव्ह स्ट्रीमिंग व्ह्यूअरशिपबद्दलचा आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला डिजिटल प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक व्ह्यूज मिळाले, ज्यामुळे लाइव्ह स्ट्रीमिंग व्ह्यूअरशिपचा विक्रम निर्माण झाला. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना ३.५ कोटी प्रेक्षकांनी डिज्नी हॉटस्टारवर पाहिला. क्रिकेट सामन्याच्या लाइव्ह स्ट्रीमिंगची मागील विक्रमी संख्या ३.२ कोटी होती, जी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या १६ व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील अंतिम सामन्यादरम्यान नोंदवली गेली होती.
भारताची फलंदाजी सुरु होताच ओलांडला ३ कोटींचा आकडा –
जेव्हा भारतीय संघाने फलंदाजीला सुरूवात केली, तेव्हा डिज्नी प्लस हॉटस्टारवरील भारत आणि पाकिस्तान विश्वचषक सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहणाऱ्यांची संख्या ३ कोटींच्या पुढे गेली. पाकिस्तानने १९२ धावांचे लक्ष्य दिल्यानंतर अनेक भारतीय चाहते त्यांच्या संघाची फलंदाजी पाहण्यासाठी उपस्थित असल्याचे यावरून दिसून येते. हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की पाकिस्तानची फलंदाजी झाली तेव्हाही प्रेक्षक संख्या २ कोटी होती.
हेही वाचा – IND vs PAK, World Cup 2023: सचिन तेंडुलकरने शोएब अख्तरला दिले चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझ्या मित्रा…’
आशिया कपमधील भारत-पाक सामना २.८ कोटी लोकांनी पाहिला –
नुकत्याच झालेल्या आशिया चषक स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचे२.८ कोटी दर्शकांनी डिज्नी प्लस हॉटस्टारवर लाइव्ह स्ट्रीमिंग पाहिले होते, जो सध्या चालू असलेल्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचा अधिकृत स्ट्रीमिंग भागीदार आहे. यापूर्वी, स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर आयसीसी टूर्नामेंट सामन्यासाठी दर्शकांची विक्रमी संख्या २.५३ कोटी होती. २०१८ च्या विश्वचषक उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान हा विक्रम नोंदवला गेला होता.
डिज्नी प्लस हॉटस्टार हे भारतातील स्टार स्पोर्ट्सचे डिजिटल स्ट्रीमिंग भागीदार आहे. हे विश्वचषक स्पर्धेतील सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण करत आहेत. प्लॅटफॉर्म तज्ञ म्हणाले, रीअल-टाइम आकडेवारी, मल्टी-कॅमेरा अँगल यांसारख्या विविध वैशिष्ट्यांची ऑफर देखील देत आहे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या महत्त्वपूर्ण विजयानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने आपली क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. पाकिस्तानविरुद्ध ८६ धावा करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. रोहित शर्माने ६३ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ८६ धावा केल्या. डेंग्यूशी झुंज देऊन परतलेल्या शुबमन गिलने ११ चेंडूत १६ धावा केल्या. श्रेयस अय्यरनेही अर्धशतक झळकावले.