क्रिकेट विश्वातील हायव्होल्टेज लढत म्हणजे भारत-पाकिस्तान सामना. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये काहीच दिवसांपूर्वी भारत-पाकिस्तान सामना पाहायला मिळाला होता. ज्या सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला होता. पण या वर्षी दोन्ही देशांमधील हायव्होल्टेज लढत पुन्हा पाहायला मिळणार आहे. येत्या काही महिन्यांतच दोन्ही देशांचे क्रिकेट संघ पुन्हा एकमेकांशी भिडणार आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आता या वर्षी आशिया चषक स्पर्धा होणार आहे, ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात किमान ३ सामने अपेक्षित आहेत. सध्या पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळली जात आहे आणि त्यातच आशिया कप २०२५ संदर्भात ही मोठी बातमी समोर आली आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत स्पर्धेसाठी सप्टेंबरमध्ये स्पर्धा होईल अशी मान्यता देण्यात आली आहे.
रिपोर्टमध्ये दिलेल्या वृत्तानुसार, ८ संघांमध्ये होणारी ही स्पर्धा सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून चौथ्या आठवड्यादरम्यान खेळवली जाणार आहे. यादरम्यान टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात सामनाही होणार आहे.
२०२६ मध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर, यावेळीचा आशिया चषकही याच फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे. या दरम्यान, सर्व आठ संघ दोन गटात विभागले जातील आणि अपेक्षेप्रमाणे भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असतील. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात गट टप्प्यात एक सामना नक्कीच खेळवला जाईल.
जर दोन्ही संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरले तर सुपर-फोर टप्प्यातही ते एकमेकांसमोर येऊ शकतात. इथून, पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघांना अंतिम फेरीत स्थान मिळेल आणि जर भारत आणि पाकिस्तान सुपर-फोर मध्ये अव्वल २ स्थानांवर राहिले तर ते तिसऱ्यांदा अंतिम फेरीत आमनेसामने येऊ शकतात.
कुठे खेळवली जाणार आशिया कप स्पर्धा?
आशिया कप स्पर्धा तटस्थ ठिकाणी आयोजित केली जाईल. यावेळी आशिया कपचे आयोजन बीसीसीआयने केले आहे. अशा स्थितीत ही स्पर्धा भारतात खेळवली जाऊ शकते, पण भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी खेळवण्याचे मान्य करण्यात आले आहे. मात्र, यजमानपदाचे अधिकार भारतीय बोर्डाकडेच राहतील. त्याचप्रमाणे, पुढच्या वेळी जेव्हा ही स्पर्धा भारत किंवा पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाईल तेव्हा ती तिसऱ्या देशात आयोजित केली जाईल. पुन्हा एकदा यासाठी यूएई किंवा श्रीलंका यापैकी एकाची निवड केली जाईल.