India vs Prime Minister Playing XI Match Timing, Live Streaming Details: रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारताच्या नेतृत्त्वाची धुरा सांभाळत जसप्रीत बुमराहने भारतीय संघाच्या मदतीने पर्थचे चक्रव्यूह भेदले. भारताने पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता दुसऱ्या कसोटीवर संघाची नजर असणार आहे. टीम इंडियाला ॲडलेडमधील डे-नाईट कसोटी सामना खेळायचा आहे. या सामन्याच्या तयारीसाठी भारतीय संघ कॅनबेरामध्ये पोहोचला आहे. तर पहिल्या कसोटीत संघाचा भाग नसलेला रोहित शर्माही संघात परतला आहे आणि रोहित दुसऱ्या कसोटीपूर्वी सराव सामना खेळताना दिसणार आहे. हा सराव सामना कधी, कुठे आणि कोणाविरूद्ध खेळवला जाणार, जाणून घेऊया.
भारतीय संघ ३० नोव्हेंबरपासून प्राईम मिनिस्टर इलेव्हन विरुद्ध दोन दिवसीय गुलाबी चेंडूची कसोटी खेळणार आहे. टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्माही या सामन्यात खेळणार आहे. या सामन्यात दोन्ही संघातील अनेक स्टार खेळाडू खेळण्याची अपेक्षा आहे.
भारत प्राईम मिनिस्टर इलेव्हन संघाविरूद्ध २००४ मध्ये शेवटचा पिंक बॉल सामना खेळला होता आणि आता दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. १९४७-४८ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी सामने सुरू झाल्यापासून भारत ऑस्ट्रेलियाच्या प्राईम मिनिस्टर इलेव्हन विरुद्ध खेळण्याची ही केवळ चौथी वेळ आहे.
कधी, कुठे आणि केव्हा पाहता येणार भारताचा सराव सामना ?
भारत विरुद्ध प्राईम मिनिस्टर इलेव्हन यांच्यातील हा सामना मनुका ओव्हल, कॅनबेरा येथे होणार आहे. ऑस्ट्रेलिया वेळेनुसार, हा सामना ३० नोव्हेंबरला दुपारी ३ वाजता सुरू होईल, तर भारतीय वेळेनुसार हा सामना सकाळी ९.३० वाजता सुरू होईल. भारत विरुद्ध प्राईम मिनिस्टर इलेव्हन सराव सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण डिस्नी प्लस हॉटस्टार ॲपवर उपलब्ध असेल. चाहत्यांना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क टीव्ही चॅनेलवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.
कसा असणार प्राईम मिनिस्टर इलेव्हनचा संघ
भारताविरुद्धच्या सराव सामन्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपला संघ जाहीर केला आहे. या सामन्यात वेगवान गोलंदाज स्कॉट बोलँड हा एकमेव खेळाडू आहे, जो ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय संघाचा देखील एक भाग आहे. या सामन्यात चमकदार कामगिरी करून तो ॲडलेड कसोटीच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करेल. या सामन्यात सॅम कॉन्स्टन्स देखील खेळणार आहे, जो डेव्हिड वॉर्नरचा सलामीवीर म्हणून उत्तराधिकारी असल्याचे पाहिले जात होते. पण नाथन मॅकस्विनीची संघात निवड करण्यात आली.
भारताविरुद्धच्या सामन्यासाठी प्राईम मिनिस्टर इलेव्हन संघ
जॅक एडवर्ड्स (कर्णधार), चार्ली अँडरसन, महली बियर्डमन, स्कॉट बोलँड, जॅक क्लेटन, एडन ओ’कॉनर, ऑली डेव्हिस, जेडेन गुडविन, सॅम हार्पर, हॅनो जेकब्स, सॅम कोन्स्टास, लॉयड पोप, मॅथ्यू रेनशॉ, जेम रायन.