भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका तीन सामन्याच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ११३ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. पाचव्या दिवशी भारताने दक्षिण अफ्रिकेचे ६ गडी झटपट बाद केले. दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहने ३, मोहम्मद शमीने ३, मोहम्मद सिराजने २ आणि आर. अश्विनने २ गडी बाद केले. दक्षिण अफ्रिकेच्या सेंच्युरिअन मैदानात भारताने पहिला कसोटी विजय मिळवला आहे.
पाचव्या दिवशीचा खेळ
पाचव्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा डीन एल्गर आणि टेम्बा बावुमा जोडी मैदानात जमली होती. मात्र एल्गर ७७ धावांवर असताना जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला क्विंटन डिकॉक जास्त काळ मैदानात तग धरू शकला नाही. क्विंटन डिकॉक २१ धावा करून तंबूत परतला. मोहम्मद सिराजने त्याचा त्रिफळा उडवला. वियान मल्डर क्विंटन पाठोपाठ बाद झाला. मल्डरने ३ चेंडूत अवघी एक धाव केली. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतने त्याचा झेल घेतला. लगेचच मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर मार्को जॅनसेन १३ धावा करून तंबूत परतला. ऋषभ पंतने त्याचा झेल घेतला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या कागिसो रबाडाला आपलं खातंही खोलता आलं नाही. अवघ्या ४ धावा करून आर. अश्विनच्या गोलंदाजीवर मोहम्मद शमीने त्याचा झेल घेतला. त्यानंतर लुंगी एनगिडी दुसऱ्या चेंडूवर बाद झाला आणि भारताला विजय मिळाला.
एल्गरने १५६ चेंडूत १२ चौकारांच्या मदतीने ७७ धावा केल्या. एडन मारक्रम (१), डीन एल्गर (७७), किगन पीटरसन (१७), रस्सी वॅनदर दुस्सेन (११) आणि केशव महाराज (८), क्विंटन डिकॉक (२१), वियान मल्डर (१), मार्को जॅनसन (१३) धावा करून बाद झाले. कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी यांना आपलं खातंही खोलता आलं नाही.
भारताने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात भारताना सर्वबाद ३२७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेनं १९७ धावा केल्या. त्यामुळे भारताला १३० धावांची आघाडी मिळी. दुसऱ्या डावात भारताने सर्वबाद १७४ धावा केल्या आणि दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी ३०४ धावांचं आव्हान दिलं. मात्र दक्षिण अफ्रिकेचा संघ सर्वबाद १९१ धावा करू शकला. भारत आत्तापर्यंत दक्षिण अफ्रिकेत ३९ सामन्यांचा समावेश असलेल्या सात मालिका खेळला आहे. परंतु अद्याप भारताला एकही मालिका जिंकता आलेली नाही. सेंच्युरियन मैदानावर भारत दोन कसोटी सामने खेळला असून दोन्ही सामन्यांमध्ये भारताने पराभव पत्करावा लागला होता. मात्र तिसऱ्या कसोटीत भारताने विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे दक्षिण अफ्रिका सेंच्युरियनवर एकूण २७ कसोटी सामने खेळली असून त्यातील २२ सामने अफ्रिकेनं जिंकले आहेत. तर आजचा सामना पकडता अवघ्या तीन सामन्यात पराभव स्वीकारला आहे. कसोटी खेळणाऱ्या प्रत्येक देशात भारतानं अफ्रिकेचा अपवाद वगळता कसोटी मालिका जिंकलेली आहे.
भारताचा संघ- केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, आर. अश्विन, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
दक्षिण अफ्रिकेचा संघ- डीन एल्गर, एडन मारक्रम, किगन पीटरसन, रस्सी वॅनदर दुस्सेन, टेम्बा बवुमा, क्विंटन डिकॉक, वियान मल्डर, मार्को जानसेन, कगिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एनगिडी