जोहान्सबर्ग : भारतीय संघातील नव्या चेहऱ्यांना आज, रविवारपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत छाप पाडण्याची संधी मिळणार आहे. विश्वविजयाने हुलकावणी दिल्यापासून भारतीय संघ प्रथमच एकदिवसीय सामना खेळणार आहे.
पुढील वर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार असल्याने आता जवळपास सर्वच संघांनी क्रिकेटच्या या लघुत्तम प्रारूपावर लक्ष केंद्रित केले आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका या संघांनीही एकदिवसीय मालिकेसाठी प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली आहे. त्यामुळे या मालिकेत या दोन्ही संघांचे भविष्यातील तारे दिसणार आहेत. २०२५ मध्ये चॅम्पियन्स करंडक एकदिवसीय स्पर्धा असून त्या दृष्टीने संघबांधणीचा आता दोन्ही संघांचा प्रयत्न असेल.
गेल्या दशकभराहूनही अधिक काळापासून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी भारतीय फलंदाजीची धुरा सांभाळली. मात्र, आता हे तारांकित फलंदाज कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर असून त्यांचा वारसा पुढे चालवण्याची जबाबदारी युवा खेळाडूंवर आहे. यापैकी काही खेळाडूंना या मालिकेत आपला लौकिक सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. या मालिकेसाठी नियमित कर्णधार रोहित, विराट आणि शुभमन गिल यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या अनुपस्थितीत साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंह आणि ऋतुराज गायकवाड या युवा फलंदाजांवर भारतीय संघाची मदार असेल.
हेही वाचा >>> IND vs SA : संजू सॅमसनची प्रतीक्षा संपली, पहिल्या सामन्यात मिळू शकते संधी, कर्णधाराने सांगितले कोणत्या क्रमांकावर खेळणार?
दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डिकॉकने भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. तसेच कर्णधार टेम्बा बव्हुमालाही या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे आता आफ्रिकेला सलामीच्या नव्या जोडीचा शोध घ्यावा लागणार आहे.
पहिला एकदिवसीय सामना जोहान्सबर्ग येथे होणार असून याच मैदानावर गुरुवारी झालेल्या अखेरच्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताने विजय मिळवला होता. आता एकदिवसीय मालिकेत हीच लय कायम राखण्याचा भारताचा प्रयत्न असेल, तर आफ्रिकेचा संघ त्यांना रोखण्यास उत्सुक असेल.
राहुलचा अनुभव महत्त्वाचा
एकदिवसीय मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात युवा फलंदाजांचा भरणा आहे. सलामीवीर साई सुदर्शन, रजत पाटीदार आणि रिंकू सिंह यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये अद्याप पदार्पणही केलेले नाही. तसेच ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांना अभावाने एकदिवसीय सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे या मालिकेत भारतासाठी केएल राहुलचा अनुभव महत्त्वाचा ठरणार आहे. राहुल या मालिकेत भारताचे कर्णधारपद भूषवणार आहे, शिवाय यष्टिरक्षणाची धुराही सांभाळेल. राहुलने विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. आता हीच लय आफ्रिकेविरुद्ध राखण्यासाठी राहुल उत्सुक असेल. मधल्या फळीत त्याला श्रेयस अय्यरची साथ लाभेल. गोलंदाजीत अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार यांना कामगिरी उंचवावी लागले. फिरकीसाठी मात्र कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यजुवेंद्र चहल असे अनुभवी पर्याय भारताकडे उपलब्ध आहेत.
संघ
* भारत : केएल राहुल (कर्णधार/यष्टिरक्षक), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, आकाश दीप.
* दक्षिण आफ्रिका : एडीन मार्करम (कर्णधार), रीझा हेन्ड्रिक्स, हेन्रिक क्लासन (यष्टिरक्षक), रासी व्हॅन डर डसन, डेव्हिड मिलर, ओटनील बार्टमन, नान्ड्रे बर्गर, टोनी डी झोर्झी, केशव महाराज, मिहलाली एमपोंगवाना, विआन मुल्डर, अँडिले फेहलुकवायो, तबरेझ शम्सी, काएल व्हेरेने, लिझाड विल्यम्स.
*वेळ : दु. १.३० वाजता * थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी