भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानची एकदिवसीय मालिका आजपासून सुरु होत आहे. आज रंगणाऱ्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात विराट कोहली फलंदाज म्हणून कशी छाप पाडतो, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे. गेल्या सात वर्षांत प्रथमच कोहलीवर नेतृत्वाची जबाबदारी नसली, तरी आज कोहलीवर विशेष लक्ष राहणार आहे कारण तो तब्बल १० महिन्यांनंतर एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळणार आहे. विशेष म्हणजे या सामन्यात विराटाने केवळ नऊ धावा केल्या तरी तो मोठ्या विक्रमाला गवसणी घालणार आहे.
सामन्यामध्ये नवा कर्णधार के. एल. राहुलसाठी विराटचे मार्गदर्शन मोलाचे ठरणार आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका १-२ अशा फरकाने गमवावी लागली. त्यानंतर कोहलीने कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. डिसेंबरमध्ये त्याची एकदिवसीय संघाच्या नेतृत्वपदावरूनही हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून एकही शतक झळकावू न शकलेल्या कोहलीला पूर्वीप्रमाणे फलंदाजी करताना पाहण्यासाठी क्रीडाप्रेमी उत्सुक आहेत. त्यातच आणखीन एका गोष्टीची भर म्हणजे एक मोठा विक्रम आपल्या नावे करण्याची संधी विराटला आहे.
विराट कोहलीला परदेशांतील एकदिवसीय सामन्यांत भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्यासाठी अवघ्या नऊ धावांची गरज आहे. सध्या विराटने परदेशी मैदानांवर खेळताना एकूण पाच हजार ५७ धावा केल्यात. या यादीमध्ये विराटच्या पुढे केवळ एका खेळाडूचं नाव असून तो खेळाडू आहे, सचिन तेंडुलकर. सचिनने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीमध्ये एकूण पाच हजार ६५ परदेशी मैदानांवर केल्यात. म्हणजेच विराटने आणखीन नऊ धावा आपल्या खात्यात जमा केल्यास तो सचिनच्या ५ हजार ६५ धावांचा हा विक्रम आपल्या नावे करु शकतो.