प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये धावांची टांकसाळ उघडणाऱ्या चेतेश्वर पुजाराने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दमदार नाबाद शतकी खेळी साकारत ‘रनमशीन’ची बिरुदावली सार्थ ठरवली. भारतातल्या खेळपट्टय़ांवर सातत्याने धावा करणाऱ्या पुजाराने परदेशातील वेगवान, चेंडूला उसळी मिळणाऱ्या खेळपट्टय़ांसाठी आपण सज्ज असल्याचे या दिमाखदार शतकाने दाखवून दिले. तिसऱ्या दिवशी झहीर-इशांतच्या प्रदर्शनाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा डाव झटपट गुंडाळत भारतीय संघाने ३६ धावांची अल्प आघाडी मिळवली. पुजाराचे संयमी शतक आणि त्याला विराट कोहलीची मिळालेली अर्धशतकी साथ, या जोरावरच भारतीय संघाने मजबूत आघाडी घेत हा सामना जिंकण्याच्या दिशेने पाऊल टाकले.
दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांना सतावणाऱ्या व्हरनॉन फिलँडरने शुक्रवारी अर्धशतक पूर्ण केले मात्र झहीर खानने त्याला स्लिपमध्ये अश्विनच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. त्याने ५९ धावांची खेळी केली. डू प्लेसिस २० धावा करून झहीरच्या गोलंदाजीवर बाद झाला. डेल स्टेन, मॉर्ने मॉर्केलही झटपट माघारी परतल्याने दक्षिण आफ्रिकेचा डाव २४४ धावांत संपुष्टात आला आणि भारतीय संघाने ३६ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली.
दुसऱ्या डावातही भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. शिखर धवन (१५) फिलँडरच्या गोलंदाजीवर कॅलिसकडे झेल देऊन बाद झाला. त्यानंतर मुरली विजय आणि चेतेश्वर पुजाराने दुसऱ्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी करत भारताचा डाव सावरला. खेळपट्टीवर स्थिरावलेला मुरली विजय (३९) कॅलिसच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर पुजाराने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. एकेरी-दुहेरी धावांवर भर देत आणि खराब चेंडूंचा समाचार घेत पुजाराने परदेशी खेळपटय़ांवर कशी फलंदाजी करावी, याचा वस्तुपाठ सादर केला. डेल स्टेनच्या गोलंदाजीवर खणखणीत चौकार लगावत पुजाराने कारकिर्दीतील सहावे तर परदेशातील पहिले कसोटी शतक साजरे केले. पुजारा-कोहली जोडीने तिसऱ्या विकेटसाठी नाबाद १९१ धावांची भागीदारी रचत भारतीय संघाला सुस्थितीत नेले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने २ बाद २८४ अशी मजल मारली आहे. पुजारा १३५ तर कोहली ७७ धावांवर खेळत आहेत. भारतीय संघाकडे ३२० धावांची दमदार आघाडी आहे.
धावफलक
भारत (पहिला डाव) : २८०
दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) : ग्रॅमी स्मिथ पायचीत गो. झहीर ६८, अलविरो पीटरसन पायचीत गो. झहीर २१, हशीम अमला त्रि.गो. इशांत ३६, जॅक कॅलिस पायचीत गो. इशांत ०, एबी डीव्हिलियर्स पायचीत गो. मोहम्मद शामी १३, जेपी डय़ुमिनी झे. विजय गो. मोहम्मद शामी २, फॅफ डू प्लेसिस झे. धोनी गो. झहीर २०, व्हरनॉन फिलँडर झे. अश्विन गो. झहीर ५९, डेल स्टेन झे. रोहित शर्मा गो. इशांत १०, मॉर्ने मॉर्केल त्रि.गो. झहीर ७, इम्रान ताहीर नाबाद ०, अवांतर : (लेगबाइज ४, वाइड १, नोबॉल ३) ८, एकूण : ७५.३ षटकांत सर्वबाद २४४
बादक्रम : १-३७, २-१३०, ३-१३०, ४-१३०, ५-१४५, ६-१४६, ७-२२६, ८-२३७, ९-२३९, १०-२४४.
गोलंदाजी : झहीर खान २६.३-६-८८-४, मोहम्मद शामी १८-३-४८-२, इशांत शर्मा २५-५-७९-४, रवीचंद्रन अश्विन ६-०-२५-०
भारत (दुसरा डाव) : शिखर धवन झे. कॅलिस गो. फिलँडर १५, मुरली विजय झे. डी व्हिलियर्स गो. कॅलिस ३९, चेतेश्वर पुजारा खेळत आहे १३५, विराट कोहली खेळत आहे ७७, अवांतर : (बाइज ५, लेगबाइज ५, वाइड ८), एकूण : ७८ षटकांत २ बाद २८४.
बादक्रम :  १-२३, २-९३
गोलंदाजी : डेल स्टेन २१-४-६४-०, व्हरनॉन फिलँडर १८-५-५३-१, मॉर्ने मॉर्केल २-१-४-०, जॅक कॅलिस १४-४-५१-१, इम्रान ताहीर ११-०-५५-०, एबी डीव्हिलियर्स १-०-५-०, जेपी डय़ुमिनी ११-०-४२-०.
मॉर्ने मॉर्केल दुखापतग्रस्त
जोहान्सबर्ग : क्षेत्ररक्षण करताना पायाच्या घोटय़ाला झालेल्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मॉर्ने मॉर्केल दुखापतग्रस्त झाला. सहकाऱ्यांच्या साथीने त्याला मैदानाबाहेर न्यावे लागले. दुसऱ्या डावात डेल स्टेनच्या गोलंदाजीवर चेतेश्वर पुजाराने मारलेला फटका अडवताना मॉर्केलच्या उजव्या पायाला दुखापत झाली.
ही दुखापत गंभीर नसली तरी मॉर्केलला या दुखापतीतून सावरण्यासाठी आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे मॉर्केल या कसोटीत गोलंदाजी करू शकणार नाही. मात्र दुसरी कसोटी २६ तारखेपासून सुरू होणार असल्यामुळे त्याच्या समावेशाविषयी साशंकता निर्माण झाली आहे.  
इशांतचा अंकुश !