India vs South Africa 2nd T20 Playing 11: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामना आज (१२ जून) रोजी ओदिशातील कटकमधील बाराबती स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवून पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसरा सामनादेखील जिंकून मालिकेत भक्कम आघाडी घेण्याचा कर्णधार टेम्बा बावुमाचा प्रयत्न असेल. तर, विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारतीय संघ प्रयत्न करेल.
सामन्याच्या दिवशी कटकमधील तापमान ३२ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. शिवाय, खेळादरम्यान पावसाचीही शक्यता नाही. बाराबती स्टेडियमची खेळपट्टी तटस्थ मानली जाते. त्यामुळे फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही येथे खेळपट्टीची साथ मिळेल,अशी अपेक्षा आहे. मधल्या काही षटकांमध्ये फिरकीपटू जास्त प्रभावी ठरू शकतात. संपूर्ण सामन्यात मात्र, वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व कायम राहण्याची अपेक्षा आहे. या खेळपट्टीवर पहिल्या डावातील फलंदाजीची सरासरी धावसंख्या १३६ आहे. याठिकाणी दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघांनी आतापर्यंत ६० टक्के सामने जिंकले आहेत.
पहिल्या सामन्यात भारताने फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली होती. निर्धारित २० षटकांमध्ये भारताने २११ धावा केल्या होत्या. त्यामध्ये सलामीवीर ईशान किशनच्या ४८ चेंडूतील ७६ धावांचा समावेश होता. मात्र, डेव्हिड मिलर आणि रॉसी व्हॅन डर डुसेन या आफ्रिकन जोडीने केलेल्या नाबाद १३१ धावांच्या भागीदारीमुळे भारताचा विजय हातातून निसटला.
भारतीय कर्णधार ऋषभ पंत दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात संघामध्ये फारसा बदल करेल अशी शक्यता नाही. फारफार तर एखादा गोलंदाज बदलला जाऊ शकतो. आज होणार सामना सायंकाळी ७ वाजता सुरू होईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. शिवाय, डिस्ने प्लस हॉटस्टारवरही या सामन्याचे ऑनलाईन प्रक्षेपण बघता येईल.
हेही वाचा – रविवार विशेष : मितालीपर्व!
संभाव्य भारतीय संघ : ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युजवेंद्र चहल.
संभाव्य दक्षिण आफ्रिका संघ : क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॉसी व्हॅन डेर डुसेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, ड्वेन प्रिटोरियस, वेन पार्नेल, कगिसो रबाडा, केशव महाराज, एनरिक नॉर्किया, तबरेज शम्सी.