महान खेळाडू हा नेहमीच आपल्या कामगिरीने ओळखला जातो, मग तो सामना पहिला असो किंवा अखेरचा, महान खेळाडू त्यामध्ये आपली चुणूक दाखवूनच जातो आणि याचा प्रत्यय आला तो जॅक कॅलिसच्या रूपामध्ये. आपल्या अखेरच्या कसोटी सामन्यामध्येही शतकी सलाम ठोकत अष्टपैलू कॅलिसने आपल्या महानपणाची ओळख क्रिकेट जगताला करून दिली. कॅलिसचे शतक आणि तळाच्या फलंदाजांनी केलेल्या उपयुक्त फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावामध्ये सर्व बाद ५०० धावा अशी मजल मारली आहे. दुसऱ्या डावात भारताची २ बाद ६८ अशी स्थिती असून ते अजूनही ९८ धावांनी पिछाडीवर आहेत.
शनिवारच्या ५ बाद २९९ धावसंख्येवरून पुढे खेळताना दक्षिण आफ्रिकेने सामन्याच्या चौथ्या दिवशी दमदार फलंदाजी केली. कॅलिसने रविवारी दिवसाची संयमी सुरुवात केली, पण वाईट चेंडूंचा समाचार घ्यायला तो या वेळी विसरला नाही. एकेरी-दुहेरी धावांबरोबरच अधूनमधून चौकार लगावत कॅलिसने नव्वदी गाठली. अखेरचा सामना आणि त्यामध्येही नव्वदीत खेळत असणाऱ्या कॅलिसवर या वेळी दडपण जाणवले नाही. रवींद्र जडेजाचा चेंडू ‘मिडऑन’ला तटवत कॅलिसने एकेरी धाव घेतली आणि आपल्या कारकिर्दीतले ४५ वे शतक झळकावले. शतक झळकावल्यावर मात्र कॅलिसला जास्त काळ फलंदाजी करता आली नाही आणि जडेजाने धोनीकरवी त्याला झेलबाद केले. कॅलिसने १३ चौकारांच्या जोरावर ११५ धावांची खेळी साकारली. कॅलिस बाद झाल्यावर दक्षिण आफ्रिकेला झटपट गुंडाळण्याचे भारताचे स्वप्न अखेर अधुरेच राहिले.
कॅलिस बाद झाला तेव्हा आफ्रिकेची ६ बाद ३८४ अशी स्थिती होती, पण त्यानंतर तळाच्या फलंदाजांनी उपयुक्त खेळी साकारत संघाची धावसंख्या फुगवली. डेल स्टेन (४४), डू प्लेसिस (४३) आणि रॉबिन पीटरसन (६१) यांनी भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत संघाला पाचशेचा पल्ला गाठून दिला. रवींद्र जडेजा याने या वेळी सर्वाधिक सहा विकेट्स घेतल्या. १६६ धावांच्या पिछाडीवरून खेळताना भारताने संयमी सुरुवात केली असली तरी भारताचे दोन्ही सलामीवीर जास्त काळ टिकाव धरू शकले नाहीत, पण चेतेश्वर पुजारा (नाबाद ३२) आणि विराट कोहली (नाबाद ११) यांनी आफ्रिकेची गोलंदाजी संयतपणे खेळून काढली. चौथ्या दिवसअखेर भारताची २ बाद ६८  अशी अवस्था असून ते अजूनही ९८ धावांनी पिछाडीवर आहेत.
आधुनिक काळातला कॅलिस सवरेत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू – शॉन पोलॅक
दरबान : आधुनिक काळातला जॅक कॅलिस हा सवरेत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. ज्या खेळाडूंना मी खेळताना पाहिले नाही त्यांच्याबरोबर कॅलिसची तुलना करणे योग्य नाही. सर गारफील्ड सोबर्स कसे खेळायचे मला कल्पना नाही. पण माझ्या अनुभवानुसार, माझ्या पिढीतील कॅलिस सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. वर्षांनुवर्षे संघासाठी शांतपणे खेळ करणारा तो खेळाडू आहे.
धावफलक
भारत (पहिला डाव) : सर्वबाद ३३४
दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) : ग्रॅमी स्मिथ झे. धवन गो. जडेजा ४७, अल्विरो पीटरसन झे. विजय गो. जडेजा  ६२, हशीम अमला त्रि.गो. मोहम्मद शामी ३, जॅक कॅलिस झे. धोनी गो. जडेजा ११५, एबी डीव्हिलियर्स झे. कोहली गो. जडेजा ७४, जेपी डय़ुमिनी पायचीत गो. जडेजा २८, डेल स्टेन झे. धोनी गो. खान ४४, फॅफ डू प्लेसिस धावचीत ४३, रॉबिन पीटरसन झे. विजय गो. खान ६१, व्हरनॉन फिलँडर नाबाद ०, मॉर्नी मॉर्केल झे.आणि गो. जडेजा ०, अवांतर : (बाइज ३, लेगबाइज १५, वाइड २, नोबॉल ३) २३.
एकूण : १५५.२ षटकांत सर्वबाद ५०० .
बादक्रम : १-१०३, २-११३, ३-११३, ४२४०, ५-२९८, ६-३८४, ७-३८७, ८४९७, ९-५००, १०-५००.
गोलंदाजी : झहीर खान २८-४-९७-२, मोहम्मद शामी २७-२-१०४-१, इशांत  शर्मा ३१-७-११४-०, रवींद्र जडेजा ५८.२- १५-१३८-६, रोहित शर्मा १११- २९-०
भारत (दुसरा डाव) : शिखर धवन झे. डू  प्लेसिस गो. पीटरसन १९, मुरली विजय झे. स्मिथ गो. फिलँडर ६, चेतेश्वर पुजारा खेळत आहे ३२, विराट कोहली खेळत आहे ११, अवांतर : ०. एकूण ३६ षटकांत २ बाद ६८. बाद क्रम: १-८, २-५३.
गोलंदाजी : डेल स्टेन ७-५-५-०, व्हेरॉन फिलँडर ६-२-९-१, मार्ने मॉर्केल ६-२-११-०, रॉबिन पीटरसन ९-२-२३१, जेपी डय़ुमिनी ८-२-२०-०.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा