भारत-दक्षिण आफ्रिका तिसरी कसोटी आजपासून * डेल स्टेन दुखापतग्रस्तच
बंगळुरूत पावसाचा प्रकोप झेलल्यानंतर, आठवडय़ाभराच्या विश्रांतीनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ नागपूरच्या जमठा स्टेडियमवर तिसऱ्या कसोटीसाठी एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत.
पहिली कसोटी अवघ्या अडीच दिवसांत जिंकत भारतीय संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. बंगळुरू येथील दुसऱ्या कसोटीतही पहिल्या दिवशी भारतीय संघाने मजबूत पकड जमवली होती, मात्र त्यानंतर पावसामुळे खेळच होऊ शकला नाही. भारतीय संघ ही कसोटी जिंकत मालिका विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी उत्सुक आहे तर ही कसोटी जिंकत बरोबरी करून भारतीय संघाला टक्कर देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ आतुर आहे.
ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत पराभवानंतर खेळपट्टय़ा फिरकीला धार्जिण्या तयार करण्यात आलेल्या आहेत. जमठाची खेळपट्टीही त्याला अपवाद नाही. खेळपट्टीच्या अशा स्वरूपामुळे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांसमोर मोठे आव्हान आहे. एबी डी‘व्हिलियर्सचा अपवाद वगळता दक्षिण आफ्रिकेचा एकही फलंदाज भारतीय फिरकीपटूंचा यशस्वीपणे सामना करू शकलेला नाही. भरवशाचा हशीम अमलाला सूर गवसत नसल्यामुळे आफ्रिकेच्या संघासमोरची चिंता वाढली आहे. डीन एल्गर, जेपी डय़ुमिनी आणि फॅफ डू प्लेसिस यांच्याकडून मोठय़ा खेळीची अपेक्षा आहे. सातत्याने खराब कामगिरीमुळे डू प्लेसिस पाचव्या क्रमांकावर खेळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास अमला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. चार गोलंदाजांनिशी खेळण्याच्या निर्णयामुळे दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी मजबूत झाली आहे, मात्र फिरकीपटूंचा सामना करत धावफलक हलता ठेवण्याचे आव्हान त्यांच्या फलंदाजांसमोर असेल.
दुखापतीतून पूर्णपणे न सावरल्याने दक्षिण आफ्रिकेचा मुख्य वेगवान गोलंदाज डेल स्टेन या कसोटीत खेळू शकणार नाही. त्याच्या अनुपस्थितीत दुखापतीतून सावरलेला मॉर्ने मॉर्केल आक्रमणाची धुरा सांभाळेल. त्याला कागिसो रबाडा आणि कायले अबॉटची साथ मिळेल. इम्रान ताहीर, सिमोन हार्मेर आणि डेन पिडट यांच्यात ताहीरला प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे.
भारतीय संघासाठी शिखर धवनचा फॉर्म चिंतेची बाब आहे. मुरली विजयला साथ देत या दोघांनी दमदार सलामी देणे अपेक्षित आहे. विराट कोहलीला कर्णधारपदाला साजेशी खेळी करण्याची गरज आहे. अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांच्यावर भारताची मोठी भिस्त आहे. पाचच फलंदाज संघात असल्याने एकाला मोठी करण्याची नितांत आवश्यकता आहे. बंगळुरूतील खेळपट्टीची स्वरूप लक्षात घेत, स्टुअर्ट बिन्नीला संघात समाविष्ट करण्यात आले होते. मात्र नागपूरमध्ये मिश्रा पुनरागमन करण्याची शक्यता आहे. रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी दक्षिण आफ्रिकेच्या डावाला खिंडार पाडले आहे. नागपूरमध्येही या द्वयीवर साऱ्यांचे लक्ष असणार आहे. इशांत शर्माच्या जोडीला कोण खेळणार याबाबत उत्सुकता आहे. घरच्या मैदानावर खेळण्याची उमेश यादवला संधी मिळणार का वरुण आरोनलाच प्राधान्य देण्यात येणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.
जमठाचे मैदान दक्षिण आफ्रिकेसाठी भाग्यशाली असून, याच मैदानावर अमलाने द्विशतकी खेळी साकारली होती, तर डेल स्टेनने सामन्यात दहा बळी घेण्याची कामगिरी केली होती. दक्षिण आफ्रिकेने तो सामना डावाच्या फरकाने जिंकला होता. स्टेनच्या अनुपस्थितीत खणखणीत प्रदर्शनाची जबाबदारी अमलाच्या खांद्यावर आहे.
संघ
भारत- विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल, अजिंक्य रहाणे, वरुण आरोन, रवीचंद्रन अश्विन, स्टुअर्ट बिन्नी, गुरकीरत सिंग मान, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा, वृद्धिमान साहा, इशांत शर्मा, रोहित शर्मा, उमेश यादव.
दक्षिण आफ्रिका- हशीम अमला (कर्णधार), डीन एल्गर, स्टॅनिअल व्हॅन झील, तेंदा बावूमा, फॅफ डू प्लेसिस, एबी डी’व्हिलियर्स, जेपी डय़ुमिनी, डेन व्हिलास, इम्रान ताहीर, सिमोन हार्मेर, डेन पिडट, डेल स्टेन, मॉर्ने मॉर्केल, कायले अबॉट, कागिसो रबाडा, र्मचट डी लाँज.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, ३ आणि एचडी वाहिन्यांवर
वेळ : सकाळी ९.३० पासून.
स्टेनच्या अनुपस्थितीचा फटका
जगातला सर्वोत्तम वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे खेळू न शकणे दुर्दैवी आहे. तो पूर्णपणे सावरलेला नाही, त्यामुळे आम्ही धोका पत्करु शकत नाही. दोन्ही कसोटीत आम्ही चांगले प्रदर्शन केलेले नाही. नागपूरच्या मैदानाचा इतिहास आमच्या बाजूने आहे. सर्वोत्तम प्रदर्शन करत पुनरागमन करण्याची क्षमता आमच्याकडे आहे. फिरकीपटूंचा समर्थपणे सामना करण्यासाठी तंत्रात आवश्यक बदल केले आहेत.
– हशीम अमला, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार
खेळपट्टीच्या स्वरुपाविषयी वारंवार चर्चा आकलनापलीकडची आहे. फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर खेळण्यात आम्हाला कोणतीही अडचण नाही. विनाकारण वाद उकरुन काढण्यात काहीच अर्थ नाही. खेळपट्टीचा नूर लक्षात घेऊन अंतिम संघ ठरवण्यात येईल. अश्विनने मोठय़ा प्रमाणावर प्रयोग न करता मूलभूत गोष्टी अचूक ठरवण्यावर त्याचे यश अवलंबून आहे.
– विराट कोहली,
भारतीय संघाचा कर्णधार