चेन्नई : भारतीय संघाने शनिवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकमेव कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आपला पहिला डाव ६ बाद ६०३ धावांवर घोषित करताना महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावे होता. त्यांनी याच वर्षी पर्थमध्ये झालेल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच आपला डाव ९ बाद ५७५ धावसंख्येवर घोषित केला होता.

भारताच्या विक्रमी धावसंख्येला उत्तर देताना दक्षिण आफ्रिकेनेही झुंज दिली. मारिझान काप आणि सुने लस यांच्या अर्धशतकांच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात ४ बाद २३६ धावा केल्या. काप १२५ चेंडूंत आठ चौकारांच्या मदतीने ६९ धावांवर खेळत आहे. सुने लस १६४ चेंडूंत सहा चौकार आणि एक षटकारासह ६९ धावा करून बाद झाली. कर्णधार लॉरा वोल्हार्ड (२०), अॅनेके बॉश (३९) आणि डेलमी टकर (०) यांना फारसे योगदान देता आले नाही. दक्षिण आफ्रिका अजूनही भारतापेक्षा ३६७ धावांनी पिछाडीवर आहे. भारताकडून स्नेह राणाने तीन, तर दीप्ती शर्माने एक बळी मिळवला.

त्यापूर्वी, चेन्नई येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात रिचा घोषने एनेरी डेर्कसनच्या १०९व्या षटकातील पहिल्या चेंडूवर चौकार लगावत भारताच्या विक्रमी धावसंख्येची नोंद केली. रिचाने कर्णधार हरमनप्रीत कौरच्या साथीने पाचव्या गड्यासाठी १४३ धावा जोडल्या. हरमनप्रीतने कसोटी कारकीर्दीतील पहिले अर्धशतक साकारताना ११५ चेंडूंत ६९ धावांची खेळी केली. रिचाने ९० चेंडूंत तब्बल १६ चौकारांच्या मदतीने ८६ धावांचे योगदान दिले.

हेही वाचा >>> Rohit Sharma T20 Retirement: रोहित शर्मानेही जाहीर केली टी-२० मधून निवृत्ती, वर्ल्डकप विजयानंतर ‘रो-को’ चा भारतीय चाहत्यांना धक्का

त्याआधी पहिल्या दिवशी भारतासाठी शफाली वर्मा (२०५) आणि स्मृती मनधाना (१४९) यांनी २९२ धावांची विक्रमी सलामी दिली होती. त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्जने (५५) अर्धशतक झळकावले. त्यामुळेच पहिल्या दिवसअखेर भारताची ४ बाद ५२५ अशी विक्रमी धावसंख्या होती. कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाने एका दिवशी केलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्यांनी श्रीलंकेच्या पुरुष संघाचा विक्रम मोडीत काढला.

संक्षिप्त धावफलक

● भारत (पहिला डाव) : ११५.१ षटकांत ६ बाद ६०३ (डाव घोषित) : (शफाली वर्मा २०५, स्मृती मनधाना १४९, रिचा घोष ८६, हरमनप्रीत कौर ६९; डेल्मी टकर २/१४१)

● दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) : ७२ षटकांत ४ बाद २३६ (मारिझान काप नाबाद ६९, सुने लस ६५; स्नेह राणा ३/६१, दीप्ती शर्मा १/४०)