टीम इंडियाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आफ्रिकन संघाला पूर्णपणे नेस्तनाबूत करत ‘व्हाइटवॉश’ दिला. तिसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ४९७ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा पहिला डाव १६२ धावांवर तर फॉलो-ऑन नंतरचा डाव १३३ धावांवर आटोपला. त्यामुळे एक डाव आणि २०२ धावांनी विजय मिळवत भारताने मालिका ३-० ने जिंकली.

तिसरा कसोटी सामना चार दिवसात संपला. हा सामना तिसऱ्या दिवशीच संपला असता पण तळाच्या फलंदाजांच्या चिवट फलंदाजीमुळे आफ्रिकेचा पराभव एक दिवस लांबला. या सामन्यात भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री हे ड्रेसिंग रूममध्ये डोळे मिटून बसल्याचे दिसून आले. त्यांच्या या फोटोवरून बरीच चर्चा रंगली. इतकेच नव्हे तर शास्त्री ट्रोल झाले आणि त्यांचे मीम्सदेखील व्हायरल झाले.

या आधीदेखील रवी शास्त्री विविध प्रकारच्या फोटोमुळे ट्रोल झाले आहेत.

दरम्यान, तिसऱ्या सामन्यात भारताच्या ४९७ धावांना प्रत्युत्तर देताना आफ्रिकेचा पहिला डाव १६२ धावांत आटोपला. दुखापतग्रस्त एडन मार्क्रमच्या जागी खेळणारा झुबायर हामझा याने टेम्बा बावुमाच्या साथीने ९१ धावांची भागीदारी केली. हामझाने दमदार अर्धशतक ठोकले. तो ६२ धावांवर बाद झाला. इतर फलंदाजांची त्याला साथ मिळू शकली नाही.

पहिल्या डावातील अपयशामुळे आफ्रिकेवर फॉलो-ऑनची नामुष्की ओढवली. त्यानंतर दुसऱ्या डावातही आफ्रिकेने खराब कामगिरी केली. त्यांचा डाव १३३ धावांत संपुष्टात आला. डी कॉक, हामझा, बावुमा, हामझा आणि क्लासें या फलंदाजांना दोन अंकी धावसंख्याही गाठता आली नाही. सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला अणि अवघ्या काही मिनिटात खेळ संपला.

Story img Loader