जोहान्सबर्ग येथे सुरू असलेल्या भारत-दक्षिण आफ्रिकेतील दुसऱ्या कसोटीत भारतीय वंशाचे अल्लाउद्दीन पालेकर मुख्य पंचांची भूमिका बजावत आहेत. तब्बल १५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पालेकर यांना प्रथमच कसोटी सामन्यात पंचगिरी करण्याची संधी मिळाली. पालेकरांचे नाते महारष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याशी जोडले गेले आहे. खरे तर पालेकर हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शिव गावचे रहिवासी आहेत. मात्र, नोकरीच्या निमित्ताने पालेकरांचे वडील वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिकेत गेले आणि तिथे अल्लाउद्दीन पालेकर यांचा जन्म झाला.
शिव गावचे सरपंच दुर्वेश पालेकर यांनी पीटीआयला सांगितले, ”मीही पालेकर आहे. तो (अल्लाउद्दीन) आमच्या शिव गावचा रहिवासी आहे. त्यांचे वडील नोकरीसाठी दक्षिण आफ्रिकेत गेले आणि नंतर ते तिथेच स्थायिक झाले. अल्लाउद्दीनचा जन्मही तिथेच झाला, पण त्याचे मूळ गाव शिव हे खेड तालुक्यात आहे.”
संपूर्ण गाव आणि ग्रामपंचायतीला त्यांचा अभिमान असल्याचे दुर्वेश पालेकर यांनी सांगितले. ”आमच्या गावाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गेले. आम्ही खूप आनंदी आहोत. इतकेच नाही, तर ४४ वर्षीय पालेकर यांनी २०१४-१५ च्या देशांतर्गत हंगामात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रणजी ट्रॉफी सामन्यात अंपायरिंग केले होते. मुंबई आणि मध्य प्रदेश यांच्यातील लीग टप्प्यातील सामन्यात पालेकर यांनी भारतीय पंच कृष्णमाचारी श्रीनिवासन यांच्यासोबत जबाबदारी पार पाडली.”
हेही वाचा – पुन्हा भारत-पाकिस्तान आमनेसामने..! थोड्याच दिवसात होणाऱ्या वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा
पालेकर आफ्रिकेचे ५७वे आणि विश्वातील ४९७वे पंच आहेत. मरायस इरास्मस यांना गुरू मानणारे पालेकर आज त्यांच्याच साथीने पंचगिरी करत आहेत. पालेकर यांना ही संधी मिळण्यासाठी एक दोन नाही, तर तब्बल १५ वर्ष वाट पहावी लागली. २००६ पर्यंत आफ्रिकेतील टायटन्स संघाकडून क्रिकेट खेळल्यानंतर त्यांनी पंचगिरीकडे वळण्याचा निर्णय घेतला.