‘‘भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्यातील एका क्षणी आम्ही सहज हरलो असतो. त्यामुळे केव्हा आणि कशी गोलंदाजी करायची, याचे धडे आमच्या गोलंदाजांना या सामन्यातून मिळाले,’’ असे कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सांगितले.
पाच दिवसांच्या या कसोटी सामन्यांत भारतीय संघाने ज्या पद्धतीने लढत दिली त्याबाबत धोनीने समाधान प्रकट केले. तो म्हणाला, ‘‘आम्हाला सामन्याच्या तयारीसाठी जो वेळ मिळाला, हे ध्यानात ठेवले तर संघाच्या कामगिरीबाबत मी आनंदी आहे. काही एकदिवसीय सामन्यांमुळे वातावरणाचा प्राथमिक अनुभव आम्हाला मिळाला.’’
तो पुढे म्हणाला, ‘‘जेव्हा आम्ही भारताबाहेर खेळतो, तेव्हा तीन वेगवान गोलंदाज आणि एक फिरकी गोलंदाज संघात असतो. फिरकी गोलंदाजाचा पहिल्या डावात पुरेसा उपयोग होत नाही. त्यामुळे वेगवान गोलंदाजांवर अतिरिक्त भार पडतो. वेगवान गोलंदाजांकडून असलेल्या अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्या आहेत.’’
या सामन्यात पाच बळी घेऊन पुनरागमन करणाऱ्या झहीर खानच्या गोलंदाजीचे धोनीने मुक्तकंठाने कौतुक केले. धोनी म्हणाला, ‘‘झहीरकडे आमच्या गोलंदाजीच्या आक्रमणाचे नेतृत्व होते. परदेशी खेळपट्टीवरील त्याचा अनुभव आम्हाला नेहमीच उपयुक्त ठरतो. तो अन्य गोलंदाजांना कशा प्रकारे गोलंदाजी करायची, याचे नेहमीच मार्गदर्शन करीत असतो. त्याची सध्याची तंदुरुस्ती कौतुकास्पद आहे.’’
भारतीय संघाची वेसेल्सकडून स्तुती
जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी दाखवलेली मानसिक वृत्ती आणि तंत्राची दक्षिण आफ्रिकेचे माजी कर्णधार केपलर वेसेल्स यांनी स्तुती केली आहे. दुसऱ्या सामन्यातही भारताने अशीच झुंज द्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ‘‘अनेक जण मालिकेविषयी बोलतात. पण मैदानावर भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी केलेली कामगिरी अप्रतिम होती,’’ असे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा