मोहाली येथे झालेला भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी समना अनेक अंगांनी चर्चेचा विषय ठऱला. भारताने श्रीलंकेला एक डाव आणि २२२ धावांनी पराभूत केले. भारताच्या या विजयासाठी अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने मोठे योगदान दिले. १७५ धावा करुन त्याने भारताचा धावफलक ५७४ पर्यंत नेऊन ठेवला. तसेच गोलंदाजीमध्येही त्याने ९ बळी घेऊन भारतासाठी विजय आणखी सोपा केला. भारताने या विजयासह श्रीलंकेविरोधात १-० अशी आघाडी घेतली आहे.
भारताने आपला पहिला डाव ५७४ धावांवर घोषित केला. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या श्रीलंकन खेळाडूंनी पहिल्या दिवशी ४३ षटकांत १०८ धावा केल्या. तर पहिल्या डावात श्रीलंकेने एकूण १७४ धावा केल्या. पहिल्या डावात पाथून निसंका वगळता श्रीलकेच्या एकाही खेळाडूने चांगली कामगिरी केली नाही. निसंकाने पहिल्या डावात १३३ चेंडूमध्ये ११ चौकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या. तर श्रीलंकेचे तब्बल चार गडी शून्यावर बाद झाले. धनंजय सिल्व्हाने फक्त एक धाव केली. याचा फटका अखेर श्रीलंकेला बसला. भारताने श्रीलंकेचा पहिला डाव १७४ धावांवर गुंडाळून लगेच फॉलोऑन दिला.
दुसऱ्या डावातही श्रीलंकेने चांगली कामगिरी केली नाही. आर. अश्विनने श्रीलंकन सलामीवीर लाहिर थिरिमानेला शून्यावर बाद केले. तसेच सातव्या षटकात आश्विननेच पाथूम निसंकचा अवघ्या सहा धावांवर बळी घेतला. अवघ्या १९ धावा झालेल्या असताना दोन गडी बाद झाल्याने श्रीलंकेचा विश्वास ढासळला आणि गडी बाद होत गेले. निसंक बाद झाल्यानंतर दिमुथ करुणारत्ने २७ धावा, धनंजया सिल्वाह ३० धावा, अँजेलो मॅथ्यूज २८ धावा, असे गडी बाद होत राहिले. परिणामी भारताने श्रीलंकेचा दुसरा डाव अवघ्या १७८ धावांवर गुंडाला आणि श्रीलंकेला एक डाव आणि २२२ धावांच्या फरकाने पराभूत केले.
दुसरीकडे फलंदाजीप्रमाणेच रविंद्र जडेजाने गोलंदाजीमध्येही उत्तुंग कामगिरी केली. श्रीलंकेच्या दोन डावांत जडेजाने ९ बळी घेतले. तर अश्विननेही जडेजाला साथ देत भारताला विजयापर्यंत नेले. अश्विनने पहिल्या डावात दोन तर दुसऱ्या डावात चार असे एकूण सहा बळी घेतले. मोहम्मद शमीने पहिल्या डावात एक तर दुसऱ्या डावात दोन बळी घेतले. बुमराहने पहिल्या डावात दोन बळी घेतले.
भारत विरुद्धा श्रीलंका या सामन्यात भारताने दणदणीत विजय संपादन केला असला तरी अश्विन आणि जडेजा यांच्यासाठी हा सामना खास ठरला. रविंद्र जडेजाने सातव्या क्रमांकावर येऊन कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा कपिल देव यांचा विक्रम मोडला. तर अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज बनला आहे. अश्विनने कसोटी सामन्यांमध्ये आतापर्यंत ४३५ विकेट्स घेतल्या आहेत.