कोलंबो कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाने श्रीलंकेवर एक डाव आणि ५३ धावांनी विजय मिळवला . या सामन्यात भारताचा फिरकीपटू रवींद्र जाडेजा याने महत्त्वाची भूमिका बजावली. यासाठी त्याला सामनावीराच्या किताबानेही गौरवण्यात आले. मात्र, याच जाडेजाला पल्लेकले येथे होत असलेल्या आगामी कसोटी सामन्यात खेळता येणार नाही. गेल्या दोन वर्षांमध्ये जडेजाकडून मैदानावर गैरवर्तणुकीचे काही प्रकार घडले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीकडून (आयसीसी) अशा गैरवर्तणुकीच्या प्रकारांची नोंद घेतली जाते आणि त्याचे नकारात्मक गूण नोंदवून ठेवले जातात. याशिवाय, कोलंबो कसोटीत त्याने आयसीसीच्या कलम २.२.८ चा भंग केला होता. एखाद्या सामन्यात खेळाडूने मैदानावरील प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडू, सपोर्ट स्टाफ, पंच, सामनाधिकारी आणि अन्य एखाद्या व्यक्तीच्या दिशेने चुकीच्या किंवा धोकादायक पद्धतीने चेंडू फेकण्याच्यासंदर्भात या कलमात नियम नमूद करण्यात आले आहेत. कोलंबो कसोटीत जडेजाकडून या कलमाचा भंग झाला. यापूर्वी ऑक्टोबर २०१६ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातील नियमभंगामुळे जडेजाच्या खात्यात तीन नकारात्मक गुणांची नोंद होती. त्यानंतर कोलंबो कसोटीतील आणखी तीन गुणांमुळे जडेजाच्या नकारात्मक गुणांची एकूण संख्या सहा इतकी झाली होती. हा आयसीसीच्या नियमांचा भंग ठरतो. त्यामुळे जडेजाला सामन्यासाठी मिळालेल्या मानधनातील ५० टक्के रक्कम कापून घेण्यात आली आहे. चारपेक्षा जास्त नकारात्मक गुण झाल्याने त्यापैकी दोन गुण निलंबनासाठी ग्राह्य धरण्यात आले. त्यामुळे जडेजा पल्लेकले येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही.

तत्पूर्वी कोलंबो कसोटी चौथ्या दिवशी श्रीलंकेवर एक डाव आणि ५३ धावांनी विजय मिळवत भारतीय संघाने, श्रीलंकेविरुद्धची मालिका २-० ने आपल्या खिशात घातली आहे. भारताकडून दुसऱ्या डावात रविंद्र जाडेजाने ५ बळी घेत श्रीलंकेचा निम्मा संघ गारद केला. त्याला हार्दिक पांड्या आणि रविचंद्रन अश्विनने २ आणि उमेश यादवने १ बळी घेत चांगली साथ दिली. कोलंबो कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन केलं. तिसऱ्या दिवशी अखेरच्या सत्रात शतकवीर कुशल मेंडीसला माघारी धाडण्यात अखेर भारतीय गोलंदाज यशस्वी ठरले होते. त्यानंतर आजच्या दिवशी सकाळच्या सत्रात दिमुथ करुणरत्ने आणि नाईट वॉचमन मलिंदा पुष्पकुमारा यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी केली. यादरम्यान करुणरत्नेने आपलं शतकही साजरं केलं. त्याला दुसऱ्या बाजूने पुष्पकुमाराने चांगली साथ दिली, मात्र मात्र रविचंद्नन अश्विनला रिव्हर्स स्विप फटका खेळण्याच्या नादात तो माघारी परतला. पाठोपाठ रविंद्र जाडेजाने कर्णधार दिनेश चंडीमलला स्लिपमध्ये अजिंक्य रहाणेला झेल द्यायला भाग पाडत श्रीलंकेला चौथा धक्का दिला.

मात्र यानंतरही दिमुथ करुणरत्ने एका बाजूने संघाचा किल्ला लढवत होता. अखेर जडेजाच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये अजिंक्य रहाणेने झेल टिपत करुणरत्नेला माघारी धाडलं. तब्बल ३०७ चेंडुंचा सामना करत त्याने १४१ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत १६ चौकारांचा समावेश होता. करुणरत्नेले अँजलो मॅथ्यूजसोबत पाचव्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी केली. त्यामुळे हे दोन्ही फलंदाज लंकेची नौका पार करुन देणार असं वाटत असतानाच रविंद्र जाडेजाने करुणरत्नेला माघारी पाठवलं. पाठोपाठ जाडेजाच्या गोलंदाजीवर अँजलो मॅथ्यूज यष्टीरक्षक साहाकडे झेल देत माघारी परतला. त्यानंतर अवघ्या काही मिनीटात दिलरुवान पेरेरा जाडेजाच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना यष्टीचित झाला. यानंतर निरोशन डिकवेला आणि धनंजय डिसिल्वा यांनी काही प्रमाणात प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण जाडेजाने डिसिल्वाला माघारी धाडत लंकेला बॅकफटूवर नेलं. यावेळी श्रीलंकेचे ८ गडी माघारी परतले होते. यानंतर तळातल्या फलंदाजांनी भारतील गोलंदाजीचा प्रतिकार करण्याचा प्रयत्नही केला नाही. ठराविक अंतराने धनंजय डिसिल्वा आणि नुवान प्रदीप हे माघारी परतले आणि भारताने कोलंबो कसोटीत आपला विजय निश्चित केला.

Story img Loader