कोलंबो कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाने श्रीलंकेवर एक डाव आणि ५३ धावांनी विजय मिळवला . या सामन्यात भारताचा फिरकीपटू रवींद्र जाडेजा याने महत्त्वाची भूमिका बजावली. यासाठी त्याला सामनावीराच्या किताबानेही गौरवण्यात आले. मात्र, याच जाडेजाला पल्लेकले येथे होत असलेल्या आगामी कसोटी सामन्यात खेळता येणार नाही. गेल्या दोन वर्षांमध्ये जडेजाकडून मैदानावर गैरवर्तणुकीचे काही प्रकार घडले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीकडून (आयसीसी) अशा गैरवर्तणुकीच्या प्रकारांची नोंद घेतली जाते आणि त्याचे नकारात्मक गूण नोंदवून ठेवले जातात. याशिवाय, कोलंबो कसोटीत त्याने आयसीसीच्या कलम २.२.८ चा भंग केला होता. एखाद्या सामन्यात खेळाडूने मैदानावरील प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडू, सपोर्ट स्टाफ, पंच, सामनाधिकारी आणि अन्य एखाद्या व्यक्तीच्या दिशेने चुकीच्या किंवा धोकादायक पद्धतीने चेंडू फेकण्याच्यासंदर्भात या कलमात नियम नमूद करण्यात आले आहेत. कोलंबो कसोटीत जडेजाकडून या कलमाचा भंग झाला. यापूर्वी ऑक्टोबर २०१६ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातील नियमभंगामुळे जडेजाच्या खात्यात तीन नकारात्मक गुणांची नोंद होती. त्यानंतर कोलंबो कसोटीतील आणखी तीन गुणांमुळे जडेजाच्या नकारात्मक गुणांची एकूण संख्या सहा इतकी झाली होती. हा आयसीसीच्या नियमांचा भंग ठरतो. त्यामुळे जडेजाला सामन्यासाठी मिळालेल्या मानधनातील ५० टक्के रक्कम कापून घेण्यात आली आहे. चारपेक्षा जास्त नकारात्मक गुण झाल्याने त्यापैकी दोन गुण निलंबनासाठी ग्राह्य धरण्यात आले. त्यामुळे जडेजा पल्लेकले येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा