थिरूवनंतपुरम : भारतीय संघाचे लक्ष्य रविवारी श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात निर्भेळ यश मिळवण्याचे असेल. कर्णधार रोहित शर्माला या सामन्यात गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. त्यामुळे लढतीत संघाच्या गोलंदाजीफळीत बदल पाहण्यास मिळू शकतो. भारताने गुवाहाटी येथील सामना जिंकल्यानंतर कोलकातामध्ये धावांचा पाठलाग करताना विजय साकारत मालिकेत विजयी आघाडी मिळवली. या सामन्यात खेळाडूंचा प्रयत्न आपली हीच लय कायम राखण्याचा असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या मालिकेनंतर भारताला न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. त्यामुळे मालिकेतील निर्भेळ यशामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावेल. आघाडीच्या पाच फलंदाजांचा प्रयत्न अखेरच्या सामन्यात चांगल्या कामगिरीचा असेल. अष्टपैलू हार्दिक पंडय़ाचाही हाच प्रयत्न राहील. त्यामुळे गोलंदाजीत काही बदल होऊ शकतो. भारताला १४ दिवसांत सहा ५० षटकांचे सामने खेळायचे आहेत, त्यामुळे मोहम्मद शमीचा कार्यभार भारतीय संघ व्यवस्थापनाच्या दृष्टीने चिंतेचा विषय असेल. जसप्रीत बुमराच्या अनुपस्थितीत शमीने बॉर्डर-गावस्कर चषकादरम्यान भारताच्या गोलंदाजीची धुरा सांभाळावी याकरता त्याच्या कार्यभारावर सर्वाधिक लक्ष देण्याची गरज आहे.

डावखुरा जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंगला अखेरच्या सामन्यात संधी मिळू शकते. कुलदीप यादवने आपल्या कामगिरीने पुन्हा एकदा सर्वाचे लक्ष वेधले होते. त्यामुळे त्याला पुन्हा संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, श्रीलंकेचा प्रयत्न अखेरच्या सामन्यात चांगली कामगिरी करत विजय मिळवण्याचा असेल.

’ वेळ : दु. १.३० वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्या)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs sri lanka 3rd odi match prediction zws