भारत आणि श्रीलंका याच्यातील पहिला कसोटी सामना मोहाली येथे सुरु आहे. या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा याने नेत्रदीपक कामगिरी केली. त्याची धमाकेदार फलंदाजी आणि मैदानावरील रुबाब क्रिकेट चाहत्यांच्या मनात घर करुन गेलाय. त्याने २२८ चेंडूंमध्ये नाबाद १७५ धावांची खेळी करत भारताचा धावफलक थेट ५७४ पर्यंत नेऊन पोहोचवला. जडेजाच्या या कामगिरीचे कौतूक होत आहेच. मात्र त्याने माजी क्रिकेटपटू कपिल देव यांचा १९८६ सालचा एक विक्रम मोडला आहे.
श्रीलंकन गोलंदाज हतबल, केल्या १७५ धावा
श्रीलंकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना ऋषभ पंतच्या नावावर राहिला. मात्र या सामन्याच्या दुसऱ्या दिवसावर जडेजाने आपले नाव कोरले. खेळाच्या सुरुवातीला जडेजा आणि आर. अश्विनने शतकी भागिदारी केली. मात्र ६१ धावांवर अश्विन झेलबाद झाल्यामुळे ही जोडी तुटली. त्यानंतरदेखील जडेजाने कसलीही हार न मानता मैदानावर घट्ट पाय रोवले. त्याने श्रीलंकन गोलंदाजांशी दोन हात करत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. भारताचा पहिला डाव घोषित होण्याअगोदार चहापाणााठी ब्रेक झाला. ब्रेकपूर्वी जडेजाने १७५ धावा केल्या होत्या. ब्रेक संपल्यानंतर जडेजा द्विशतकाकडे वाटचाल करणार का ? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मात्र त्याआधीच भारताने आपला पहिला डाव घोषित केला.
कपिल देव यांचा मोडला विक्रम
मात्र आपल्या धमाकेदार फलंदाजीने जडेजाने भारतीय क्रिकेट रसिकांचे मन तर जिंकलेच. उलट कपिल देव यांचा १९८६ सालचा विक्रमदेखील मोडला. सातव्या क्रमांकावर येऊन सर्वाधिक धावा करण्याचा कपिल देव यांचा १९८६ सालचा रेकॉर्ड रविंद्र जडेजाने मोडलाय. जडेजाने सातव्या क्रमांकवर फलंदाजीसाठी येऊन तब्बल १७५ धावा केल्या आहेत. जडेजा आणि कपिल देव यांच्याव्यतिरिक्त सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येऊन १५० पेक्षा जास्त धावा करणाऱ्यांच्या रांगेमंध्ये ऋषभ पंतचेदेखील नाव आहे. ऋषभणे १५९ धावा केलेल्या आहेत. तर कपिल देव यांनी १९८६ च्या डिसेंबरमध्ये श्रीलंकेविरुद्ध कानपूरमध्ये खेळताना १६३ धावा केल्या होत्या.
दरम्यान, भारताने आपला पहिला डाव ५७४ धावांवर घोषित केला. श्रीलंकेने आतापर्यंत ४३ षटकांमध्ये १०८ धावा केल्या असून. त्यांचे चार गडी तंबूत परतले आहेत.